घरक्रीडाधोनीची टोळी लढणार हैदराबादच्या नवांबासोबत

धोनीची टोळी लढणार हैदराबादच्या नवांबासोबत

Subscribe

आयपीएल आता अंतिम टप्प्यात येऊन ठेपली आहे. रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपरकिंग्ज विरूद्ध सनरायजर्स हैदराबाद असा सामना रंगणार आहे. पहिल्या उपांत्य फेरीत सनरायजर्सला हरवत चेन्नईचा संघ फायनल मध्ये पोहचला. मात्र पॅांइट टेबलमध्ये सर्वात वर असल्याने हैदराबादकडे दुसरी संधी होती ज्याचे सोने करत हैदराबाद अंतिम सामन्यात पोहोचली आहे.

सीएसके आणि सनरायजर्स दोघांचाही या स्पर्धेतील आतापर्यंतचा प्रवास भन्नाट आहे. दोन्ही टीमच्या कर्णधारांची खेळी अगदी बघण्याजोगी आहे. धोनीने आपला जुना स्ट्राईक रेट पुन्हा दाखवत सर्वांचेच लक्ष्य वेधले आहे. त्यासोबत डेव्हिड वॉर्नरच्या अनुपस्थित अनायसे कर्णधार झालेल्या विल्यम्सने टी-२० मध्ये प्रथमच इतके जबरदस्त प्रदर्शन दाखवले आहे बॅटिंगसह बॉलिंगमध्येच नाही तर फिल्डिंगमध्येही दोन्ही टीमच्या प्लेयर्सनी कमालीचा खेळ केला आहे. त्यामुळे एकमेकांना तोडीस तोड असणाऱ्या या सघांची फायनल नक्कीच बघण्याजोगी असेल. रविवारी मुंबईच्या वानखेडेवर या दोन्ही संघामध्ये फायनल मॅच रंगणार आहे.

- Advertisement -

सुपरकिंग्ज विरूद्ध सनरायजर्स अबतक

या वर्षीच्या ११व्या हंगामात हे दोन्ही संघ तीनवेळा एकमेंकासमोर आले ज्यात चेन्नईने तिन्ही वेळा हैदराबादला धूळ चारली आहे. २०व्या मॅचमध्ये पहिल्यांदा सीएसके आणि सनरायजर्स आमनेसामने आले होते. सनरायजर्सने टॉस जिंकत बॉलिंग घेतली ज्याचे कारण त्यांचे पॉवरफुल बॉलर्स. मात्र हा सामना याला पूर्णपणे अपवाद ठरला. आतापर्यंत कमालीची बॉलिंग करणारे सनरायजर्सचे बॉलर राशिद, सिद्धार्थ यांना सीएसकेच्या बॅट्समननी चांगलाच चोप देत १८२ रनांचा डोंगर उभा केला. जो सनरायजर्सला गाठता आला नाही कर्णधार विलियम्सन कडून पूर्ण प्रयत्न झाला मात्र त्यांना सामना जिंकता आला नाही. दुसऱ्या मॅचमध्ये पहिली बॅटिंग मिळाली असता, सनरायजर्सने १७९ रन केले मात्र सीएसकेच्या रायडूने ठोकलेल्या नाबाद शतकाच्या जोरावर सीएसकेने सनरायजर्सला पुन्हा धूळ चारली. यानंतर थेट पहिल्या उपांत्य फेरीत हे दोन्ही संघ आमने सामने आले. यावेळी सनरायजर्सने केवळ १३९ रन बनविले मात्र यावेळी सनरायजर्सने चांगली बॉलिंग केली, फाफ डुप्लेसिसच्या नाबाद ६७ धावांनी सीएसकेला थेट फायनलमध्ये पोहोचवले. एकंदरीत पाहता या दोन्ही संघातील सर्वच सामने चुरशीचे झाले, ज्यामुळे अंतिम सामनाही चुरशीचा होईल हे नक्की.

फायनलचा गेम प्लॅन कसा असेल

अंतिम सामन्यात आमनेसामने असणारे दोन्ही संघ ताकदवर आहेत. हे त्यांच्या आतापर्यंतच्या खेळातून दिसून आले. दोन्ही संघात तळापर्यंत सर्वच उत्कृष्ट बॅटिंग करताना दिसून आले, मग ते शार्दुलचे उपांत्य फेरीतील सिद्धार्थला मारलेले दोन चौकार असो किंवा राशिदने कोलकात्याविरीधात केलेले १० बॉलवर नाबाद ३४ रन. यावरून दिसून येते की दोन्ही संघात अगदी सर्वच खेळाडू उत्तम बॅटिंग करताना दिसून येतात. त्यामुळे अंतिम सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे. सुरुवातीपासून उत्तम बॉलिंग केलेल्या हैदराबादचे बॉलर्स गेल्या काही सामन्यांपासून तितके खास प्रदर्शन करताना दिसत नाही आहेत. त्यामुळे या सामन्यात हैदराबादला खास बॉलिंगवर लक्ष्य द्यावे लागणार आहे. तसेच चेन्नईला आपला फॉर्म आहे तसाच ठेवत बॉलिंगसह बॅटिंगवर देखील लक्ष्य केंद्रीत करावे लागणार आहे. कारण काही वेळापासून फॉर्ममध्ये नसलेले हैदराबादचे बॉलर्स कोलकात्या विरुद्धच्या सामन्यात चांगले खेळताना दिसले. राशीद खानचा परत आलेला फॉर्म चेन्नईसाठी धोक्याचा ठरू शकेल. त्यासाठी योग्यप्रकारे बॅटिंग ऑर्डरवर धोनीला लक्ष्य द्यावे लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -