IPL 2020 : चेन्नई सुपर किंग्सला रैनाची उणीव नक्कीच भासेल!

सुरेश रैनाची जागा इतर खेळाडूने घेणे अवघड आहे असे अ‍ॅल्बी मॉर्केलला वाटते.     

Suresh Raina
सुरेश रैना     

चेन्नई सुपर किंग्सचा (सीएसके) प्रमुख फलंदाज सुरेश रैना यंदाच्या आयपीएल स्पर्धेत खेळणार नाही. त्याने वैयक्तिक कारणास्तव यंदा या स्पर्धेतून माघार घेतली आहे. रैना हा चेन्नईच्या फलंदाजीचा आधारस्तंभ आहे. त्याने या संघाकडून सर्वाधिक धावा केल्या आहेत. तसेच युएईतील खेळपट्ट्या फिरकीला अनुकूल असण्याची शक्यता असून रैना फिरकीविरुद्ध फटकेबाजी करण्यासाठी ओळखला जातो. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेत रैनाची उणीव चेन्नईला नक्कीच भासेल, असे दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू अ‍ॅल्बी मॉर्केलला वाटते.

संघात काही बदल करावे लागतील

रैनाने आयपीएलमध्ये चेन्नईसाठी खोऱ्याने धावा केल्या असून तो उत्कृष्ट क्षेत्ररक्षकही आहे. त्यामुळे त्याची उणीव चेन्नई संघाला नक्कीच भासेल. त्याची जागा इतर कोणत्याही खेळाडूने घेणे जरा अवघड आहे. त्याची उणीव भरून काढण्यासाठी चेन्नईच्या संघ व्यवस्थापनाला संघात काही बदल करावे लागतील आणि संघ संतुलित व्हावा यासाठी प्रयत्न करावे लागतील, असे मॉर्केलने एका मुलाखतीत सांगितले.

धोनी इतरांसमोर आदर्श ठेवतो

रैना यावर्षी आयपीएलमध्ये खेळणार नसल्याने महेंद्रसिंग धोनी वरच्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकेल. धोनीने कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी केली, तरी तो यशस्वी होईल याची मॉर्केलला खात्री आहे. मॉर्केल याआधी चेन्नईकडून खेळला असून त्याने कर्णधार म्हणून धोनीचे कौतुक केले. मला चेन्नईकडून खेळताना खूप मजा आली. मी सहा वर्षे या संघाचे प्रतिनिधित्व केले होते आणि आम्हाला बरेच यश मिळाले होते. आमच्या या यशामागे मुख्य कारण होते, ते म्हणजे धोनीचे नेतृत्व. तो स्वतः चांगला खेळून इतरांसमोर आदर्श ठेवतो, असे मॉर्केलने नमूद केले.