घरक्रीडासध्याच्या वेगवान गोलंदाजांनी भारतीय क्रिकेटचा चेहरा बदलला!

सध्याच्या वेगवान गोलंदाजांनी भारतीय क्रिकेटचा चेहरा बदलला!

Subscribe

जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि ईशांत शर्मा या भारताच्या तेज त्रिकुटाने मागील २-३ वर्षांत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यांना उमेश यादव आणि भुवनेश्वर कुमार यांनी उत्तम साथ दिली आहे. त्यांच्या कामगिरीच्या जोरावर भारताला परदेशातही सातत्याने कसोटी सामने जिंकण्यात यश आले आहे. तसेच एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये नवदीप सैनी, दीपक चहर, खलील अहमद या युवकांनीही चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे भारताकडे सध्या जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांची फळी असून त्यांनी भारतीय क्रिकेटचा चेहरा बदलला आहे, असे विधान भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी केले.

मी याआधी अशी वेगवान गोलंदाजांची फळी पाहिलेली नाही आणि भारताकडे अशी फळी असू शकेल असा विचारही कधी केला नव्हता. त्यामुळे भारताकडे सध्या जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांची फळी आहे हे मी सांगण्याची गरज नाही. मागील चार-पाच वर्षांत वेगवान गोलंदाजांनी भारतीय क्रिकेटचा चेहरा बदलला आहे, असे कपिल देव म्हणाले.

- Advertisement -

जसप्रीत बुमराहला पाठीच्या दुखापतीमुळे सध्या सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकावे लागत आहे. त्याच्या अनुपस्थितीत शमीने पहिल्या कसोटीच्या दुसर्‍या डावात ५ विकेट्स मिळवल्या. शमीचे कौतुक करताना कपिल देव म्हणाले, शमी जागतिक क्रमवारीत अव्वल १० गोलंदाजांमध्ये नाही याची चिंता करण्याची गरज नाही. तो संघाच्या विजयात योगदान देतो हे जास्त महत्त्वाचे आहे.

तो सध्या चांगली कामगिरी करत असल्याचा मला आनंद आहे. भारतात इतके उत्कृष्ट गोलंदाज घडत आहेत, याचा मला अभिमान आहे. या गोलंदाजांना आयपीएलसारख्या स्पर्धेचा खूप फायदा होत आहे. वेगवान गोलंदाज जितका जास्त खेळतो, तितका तो परिपक्व होतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -