French Open 2020 : डॅनिएले कॉलिन्स उपांत्यपूर्व फेरीत 

उपांत्यपूर्व फेरीत कॉलिन्सचा सामना सोफिया केनिनशी होईल.

danielle rose collins
डॅनिएले रोज कॉलिन्स

अमेरिकेची बिनसीडेड टेनिसपटू डॅनिएले रोज कॉलिन्सने फ्रेंच ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची ही कॉलिन्सची पहिलीच वेळ ठरली. महिला जागतिक क्रमवारीत ५७ व्या स्थानी असणाऱ्या कॉलिन्सने उप-उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात ट्युनिशियाच्या ऑन्स जाबेऊरचा ६-४, ४-६, ६-४ असा पराभव केला. आता महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत तिचा अमेरिकेच्याच चौथ्या सीडेड सोफिया केनिनशी सामना होईल.

कॉलिन्सने तिचा खेळ उंचावला

उप-उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यातील पहिल्या सेटमध्ये कॉलिन्स आणि जाबेऊरमध्ये ४-४ अशी बरोबरी होती. मात्र, यानंतर कॉलिन्सने जाबेऊरची सर्विस मोडत आणि आपली सर्विस राखत पहिला सेट ६-४ असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्येही कॉलिन्सने चांगला खेळ सुरु ठेवत ३-० अशी आघाडी मिळवली. मात्र, जाबेऊरने दमदार पुनरागमन करत हा सेट ६-४ असा जिंकत सामन्यात १-१ अशी बरोबरी केली. तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये कॉलिन्सने पुन्हा तिचा खेळ उंचावला. तिने हा सेट ६-४ असा जिंकत आगेकूच केली. उपांत्यपूर्व फेरीत कॉलिन्सचा सामना सोफिया केनिनशी होईल. केनिनने उप-उपांत्यपूर्व फेरीत फ्रेंचच्या फिओना फेरोवर २-६, ६-२, ६-१ अशी मात केली होती.

जोकोविचने केला खाचानोव्हचा पराभव

पुरुष एकेरीत अव्वल सीडेड नोवाक जोकोविच आणि पाचव्या सीडेड स्टेफानोस त्सीत्सीपसला उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात यश आले. जोकोविचने रशियाच्या कारेन खाचानोव्हचा ६-४, ६-३, ६-३ असा, तर त्सीत्सीपसने ग्रिगोर दिमित्रोव्हचा ६-३, ७-६, ६-२ असा पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली. तसेच आंद्रेय रुबलेव्हनेही उपांत्यपूर्व फेरी गाठली.