Tuesday, January 19, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा IND vs AUS : डेविड वॉर्नरच्या पुनरागमनाने ऑस्ट्रेलियन संघ होईल मजबूत!

IND vs AUS : डेविड वॉर्नरच्या पुनरागमनाने ऑस्ट्रेलियन संघ होईल मजबूत!

वॉर्नरच्या अनुभवाचा ऑस्ट्रेलियन संघाला फायदा होईल असे मार्नस लबूशेनला वाटते.

Related Story

- Advertisement -

सिडनी कसोटीत सलामीवीर डेविड वॉर्नरचे पुनरागमन झाल्यास ऑस्ट्रेलियन संघ मजबूत होईल, असे मत ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लबूशेनने व्यक्त केले. तसेच वॉर्नरच्या फलंदाजीचा आणि त्याच्या अनुभवाचा ऑस्ट्रेलियन संघाला फायदा होईल असेही लबूशेनला वाटते. भारताविरुद्ध अखेरच्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना झालेल्या दुखापतीमुळे वॉर्नर टी-२० मालिका, तसेच कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांना मुकला. परंतु, ७ जानेवारीपासून सिडनीत होणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठी वॉर्नरचा ऑस्ट्रेलियन संघात समावेश करण्यात आला आहे.

वॉर्नरचे तिसऱ्या कसोटीत पुनरागमन झाल्यास ऑस्ट्रेलियन संघ मजबूत होईल. वॉर्नर हा फारच उत्कृष्ट खेळाडू असून त्याने कसोटीत ७००० हून अधिक धावा केल्या आहेत. तसेच त्याने या धावा जवळपास ५० च्या सरासरीने केल्या आहेत. त्याची जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणना होते. तो मैदानात खूप ऊर्जेने खेळतो. तो संघात असल्यास इतर खेळाडूंचा आत्मविश्वास वाढतो. त्याचा अनुभव आम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल, असे लबूशेनने सांगितले.

- Advertisement -

भारताविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीत वॉर्नरच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियन फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. केवळ कर्णधार टीम पेन (४३.५०) आणि लबूशेन (३२.२५) या दोन ऑस्ट्रेलियन फलंदाजांना ३० हून अधिकच्या सरासरीने धावा करता आल्या आहेत. त्यामुळे पूर्णपणे फिट नसतानाही वॉर्नरला तिसऱ्या कसोटीत खेळवण्याचा धोका पत्करण्यास ऑस्ट्रेलियन संघ तयार असल्याचे ऑस्ट्रेलियाचा सहाय्यक प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्डने सांगितले होते. वॉर्नर पूर्णपणे फिट होईल अशी त्याला आणि आम्हालाही आशा आहे. मात्र, तो ९०-९५ टक्के फिट असतानाही आम्ही त्याला सिडनी कसोटीत खेळवण्याचा धोका पत्करू शकतो, असे मॅकडोनाल्ड म्हणाला होता.

- Advertisement -