भारताविरुद्ध डे-नाईट कसोटी सामन्यात आमचे पारडे जड!

ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथचे मत

Mumbai
स्टिव्ह स्मिथ

करोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षाच्या अखेरीस होणारा भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा रद्द होण्याबाबत चर्चा सुरू होती. मात्र, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मागील आठवड्यात या दौर्‍याचे वेळापत्रक जाहीर करत सर्व चर्चांना पूर्णविराम लावला. दोन संघांमध्ये चार कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. कसोटी मालिकेतील अ‍ॅडलेड येथे होणारा दुसरा सामना डे-नाईट होणार आहे. भारताला आतापर्यंत केवळ एक, तर ऑस्ट्रेलियाला तब्बल सात गुलाबी चेंडूने होणार्‍या डे-नाईट कसोटी सामन्यांचा अनुभव आहे. त्यामुळे अ‍ॅडलेड येथे होणार्‍या सामन्यात आमचे पारडे जड असेल, असे मत ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टिव्ह स्मिथने व्यक्त केले.

आम्ही गुलाबी चेंडूचे सामने भारतापेक्षा जास्त खेळलो आहोत. त्यामुळे अ‍ॅडलेड येथे होणार्‍या सामन्यात आमचे पारडे थोडे जड असेल. भारतीय संघाने कोलकाता येथे झालेल्या (बांगलादेशविरुद्ध) डे-नाईट कसोटीत चांगली कामगिरी केली होती. मात्र, आता आमच्याविरुद्धचा सामना पूर्णपणे वेगळा असेल. गुलाबी चेंडूने खेळताना बरेचदा अडचण येते. परंतु, या आव्हानावर मात करू शकतील असे फलंदाज भारताकडे नक्कीच आहेत. त्यांचे गोलंदाजही सिमचा अप्रतिम वापर करतात. भारताकडे उत्कृष्ट खेळाडू असून कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे, असे स्मिथने सांगितले.

स्मिथ आणि भारताचा कर्णधार विराट कोहली हे सध्या जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखले जातात. त्यामुळे या दोघांमध्ये सतत तुलना होत असते. या तुलनेबद्दल विचारले असता स्मिथ म्हणाला, मी विराटचा प्रशंसक आहे. तो ज्या पद्धतीने, ज्या जिद्दीने खेळतो ते मला आवडते. त्याने आपल्या फिटनेसमध्ये खूपच सुधारणा केली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना त्याची कामगिरी फारच उत्कृष्ट आहे. दबावाच्या परिस्थितीतही तो संयम राखतो आणि सामने जिंकवतो हे विशेष.

टी-२० वर्ल्डकप लांबणीवर पडल्यास आयपीएल स्पर्धा खेळण्याची तयारी!
करोनामुळे यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० विश्वचषक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास बीसीसीआय या काळात आयपीएलचे आयोजन करण्याचा विचार करत आहे. स्टिव्ह स्मिथने आयपीएलमध्ये खेळण्याची तयारी दर्शवली आहे. एकदिवसीय क्रिकेट असो किंवा टी-२०, विश्वचषकात देशाचे प्रतिनिधित्व करणे ही कोणत्याही खेळाडूसाठी खूप मोठी गोष्ट असते. त्यामुळे मला नक्कीच टी-२० विश्वचषक खेळायला आवडेल. परंतु, ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आणि आयपीएल स्पर्धा झाली, तर माझी त्यात खेळण्याची तयारी आहे, असे स्मिथ म्हणाला. स्मिथ आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचे नेतृत्व करणार आहे.