घरक्रीडा‘गुलाबी’ अध्यायासाठी टीम इंडिया सज्ज!

‘गुलाबी’ अध्यायासाठी टीम इंडिया सज्ज!

Subscribe

बांगलादेशविरुद्धची डे-नाईट कसोटी आजपासून

कोलकात्याचे ईडन गार्डन्स स्टेडियम भारतीय क्रिकेटमधील ऐतिहासिक सामन्यासाठी सज्ज झाले आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात शुक्रवारपासून दुसर्‍या कसोटीला सुरुवात होणार असून हा दोन्ही संघांचा पहिलावहिला डे-नाईट (प्रकाशझोतात) कसोटी सामना असेल. त्यामुळे या सामन्याबाबत खेळाडू आणि चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता आहे. गुलाबी चेंडूने खेळल्या जाणार्‍या या सामन्याच्या पहिल्या चार दिवसांची सर्व तिकिटे आधीच विकली गेली आहेत. चार वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये पहिला डे-नाईट कसोटी सामना खेळवला गेला. त्यानंतर अशाप्रकारचे अकरा सामने झाले आहेत. मात्र, डे-नाईट कसोटी सामना खेळण्यास भारतीय संघाने वर्षानुवर्षे विरोध दर्शवला होता. परंतु, बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने पुढाकार घेत कर्णधार विराट कोहलीला हा सामना खेळण्यास तयार केले.

ईडनवर होणार्‍या या सामन्याला बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, कपिल देव, सुनील गावस्कर यांचीही उपस्थिती लाभणार आहे. त्यामुळे या सामन्याचे महत्त्व अधिकच वाढणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) हे जगातील सर्वात श्रीमंत आणि शक्तिशाली क्रिकेट मंडळ म्हणून ओळखले जाते. त्यामुळे या सामन्यावर जगभरातील चाहत्यांचे, तसेच क्रिकेट मंडळांचे लक्ष असेल. भारत आणि बांगलादेशने डे-नाईट कसोटी खेळण्यास तयारी दर्शवली असली तरी या सामन्याबाबत बरेच प्रश्न उपस्थित केले जात होते.

- Advertisement -

डे-नाईट कसोटी सामन्यात गुलाबी चेंडूचा वापर केला जातो. इतर देशांमध्ये हा चेंडू कुकबुरा कंपनी पुरवते, पण भारतात एसजी कंपनीचा चेंडू वापरला जाणार आहे. त्यामुळे हा चेंडू कशी हालचाल करणार, संध्याकाळ आणि रात्रीच्या वेळी चेंडू नीट दिसणार का, या गोष्टींची खेळाडूंना नीटशी कल्पना नाही. तसेच दव पडले, तर गोलंदाजांना अडचणी निर्माण होऊ शकतील. त्यामुळे बंगाल क्रिकेट असोसिएशनला या सामन्याची तयारी करताना बरीच काळजी घ्यावी लागली आहे. मात्र, या सर्व आव्हानांवर मात करत भारताचे घरच्या मैदानावर सलग बारावी कसोटी मालिका जिंकण्याचे लक्ष्य आहे.

इंदूर येथे झालेला पहिला कसोटी सामना भारताने एक डाव आणि १३० धावांनी जिंकत दोन सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली. त्यामुळे बांगलादेशला ही मालिका गमवायची नसल्यास कोलकाता येथे होणारा दुसरा सामना जिंकणे अनिवार्य आहे. पहिल्या कसोटीत भारताने अपेक्षेप्रमाणे खेळ केला. मोहम्मद शमी, ईशांत शर्मा आणि उमेश यादव या तेज त्रिकुटाच्या भेदक मार्‍यामुळे भारताने हा सामना अवघ्या तीन दिवसांत जिंकला. सलामीवीर मयांक अगरवालने आपल्या कारकिर्दीतील दुसरे द्विशतक झळकावत सामनावीराचा पुरस्कार पटकावला. त्यामुळे दुसर्‍या सामन्यात त्याला आणि भारताच्या इतर फलंदाजांना रोखण्याचे बांगलादेशी गोलंदाजांसमोर आव्हान आहे. पहिल्या सामन्यात बांगलादेशला अष्टपैलू शाकिब अल हसनची उणीव प्रकर्षाने जाणवली. या सामन्यात फलंदाजीत मुशफिकूर रहीम आणि गोलंदाजीत अबू जायेद या दोघांनाच छाप पाडता आली. मात्र, मालिकेत बरोबरी करण्यासाठी त्यांना इतरांची साथ मिळणे गरजेचे आहे.

- Advertisement -

प्रतिस्पर्धी संघ –

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रविंद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, ईशांत शर्मा, शुभमन गिल, रिषभ पंत.

बांगलादेश : मोमिनुल हक (कर्णधार), इम्रुल कायेस, मुशफिकूर रहीम, मोहमदुल्लाह, मोहम्मद मिथुन, लिटन दास, मेहदी हसन, मुस्तफिझूर रहमान, नईम हसन, सैफ हसन, शदमन इस्लाम, तैजुल इस्लाम, अबू जायेद, इबादत हुसेन, मोसादेक हुसेन.

सामन्याची वेळ – दुपारी १ पासून
थेट प्रक्षेपण – स्टार स्पोर्ट्स नेटवर्क

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -