IPL 2020 : दिल्ली, मुंबई इंडियन्स आतापर्यंतचे सर्वोत्तम संघ – आगरकर

मुंबई आणि दिल्ली या दोन्ही संघांचे सात सामन्यानंतर १० गुण आहेत.

shreyas iyer and rohit sharma
श्रेयस अय्यर आणि रोहित शर्मा 

दिल्ली कॅपिटल्स आणि गतविजेते मुंबई इंडियन्स हे यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील आतापर्यंतचे सर्वोत्तम दोन संघ आहेत, असे मत भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरने व्यक्त केले. मुंबई आणि दिल्ली या दोन्ही संघांना यंदाची आयपीएल स्पर्धा जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. मुंबईने आतापर्यंत चार वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले असून दिल्ली यंदा पहिल्यांदा ही स्पर्धा जिंकण्याच्या प्रयत्नात आहे. या दोन्ही संघांनी यंदा चांगली कामगिरी केली आहे. मुंबई आणि दिल्ली या दोन्ही संघांचे सात सामन्यानंतर १० गुण असून हे गुणतक्त्यातील अव्वल दोन संघ आहेत. त्यामुळेच आगरकरने या दोन्ही संघांची स्तुती केली.

दोन्ही संघ सर्वात संतुलित 

आयपीएल स्पर्धा कोण जिंकणार? हे सांगणे नेहमीच अवघड असते. काही संघ सुरुवातीपासून चांगला खेळ करतात, तर काही संघ त्यांचा खेळ हळूहळू उंचावतात. मात्र, आतापर्यंत मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे यंदाच्या मोसमातील सर्वोत्तम संघ वाटत आहेत. हे दोन्ही संघ सर्वात संतुलित आहेत. तसेच कोलकाता नाईट रायडर्स संघही प्ले-ऑफमध्ये प्रवेश करेल असे मला वाटते. प्ले-ऑफमधील चौथा संघ राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यापैकी एक असू शकेल. मला चेन्नई सुपर किंग्स संघाकडूनही खूप अपेक्षा होती. ते जेतेपदासाठी दावेदार असतील असे मला वाटले होते. परंतु, त्यांना अपेक्षित खेळ करता आलेला नाही. सध्या मुंबई आणि दिल्ली हे संघ या स्पर्धेतील सर्वोत्तम संघ आहेत, असे आगरकरने सांगितले.