घरक्रीडासायना पहिल्याच फेरीत गारद

सायना पहिल्याच फेरीत गारद

Subscribe

डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धा

भारताची आघाडीची बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवालला डेन्मार्क ओपनच्या पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. सायनाला मागील काही काळात दुखापतींनी सतावले आहे. तसेच ती ज्या स्पर्धांमध्ये खेळली आहे, त्यातही तिला फारसे यश मिळालेले नाही. दुसरीकडे पुरुष एकेरीत समीर वर्माने उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. त्याने पहिल्या फेरीत जपानच्या कांटा त्सुनेयामावर २१-११, २१-११ असा सहज विजय मिळवला.

महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत सायनाचा जपानच्या सायाका ताकाहाशीने १५-२१, २१-२३ असा सरळ गेममध्ये पराभव केला. या सामन्याच्या पहिल्या गेमच्या सुरुवातीला ताकाहाशीकडे ८-७ अशी केवळ एका गुणाची आघाडी होती. मात्र, तिने मध्यंतराला आपली आघाडी ११-८ अशी वाढवली. मध्यंतरानंतरही ताकाहाशीने अप्रतिम खेळ सुरु ठेवत १७-११ अशी मोठी आघाडी मिळवली. अखेर तिने हा गेम २१-१५ असा जिंकला. दुसर्‍या गेममध्ये सायना पुनरागमन करेल असे अपेक्षित होते आणि सुरुवातीला तसेच झाले.

- Advertisement -

तिने या गेमची दमदार सुरुवात करत ७-४ अशी आघाडी मिळवली. मात्र, ताकाहाशीने पुढील ८ पैकी ७ गुण मिळवले. त्यामुळे मध्यंतराला सायना ८-११ अशी पिछाडीवर गेली. यानंतर सायनाने चांगले पुनरागमन करत ताकाहाशीची आघाडी १३-१५ अशी कमी केली आणि २१-२१ अशी बरोबरी केली. परंतु, यापुढील सलग दोन गुण मिळवत ताकाहाशीने हा गेम आणि सामना जिंकला.

प्रणव-सिक्की रेड्डीचा विजय

- Advertisement -

भारताची जोडी प्रणव जेरी चोप्रा आणि सिक्की रेड्डीला डेन्मार्क ओपन स्पर्धेतील मिश्र दुहेरीच्या पहिल्या फेरीत विजय मिळवण्यात यश आले. त्यांनी मार्विन सीडेल आणि लिंडा एफ्लेर या जर्मनीच्या जोडीला २१-१६, २१-११ असे पराभूत केले. आता पुढील फेरीत त्यांचा मलेशियाच्या चॅन पेंग सून आणि गोह लिऊ यिंगशी सामना होईल. सात्विकसाईराज रणकिरेड्डी आणि अश्विनी पोनप्पा यांनी अखेरच्या क्षणी स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -