Friday, August 7, 2020
Mumbai
27.5 C
घर क्रीडा धवन, राहुलसाठी खालच्या क्रमांकवर खेळण्याची तयारी!

धवन, राहुलसाठी खालच्या क्रमांकवर खेळण्याची तयारी!

Mumbai
virat kohli
कर्णधार कोहलीचे उद्गार

ऑस्ट्रेलियाविरुद्ध मंगळवारी होणार्‍या पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मासोबत शिखर धवन आणि लोकेश राहुलपैकी कोणाला सलामीला पाठवायचे, असा कठीण प्रश्न भारतीय संघ व्यवस्थापनासमोर आहे. राहुलने मागील काही सामन्यांत उत्कृष्ट कामगिरी केली आहे, तर डावखुर्‍या धवनच्या गाठीशी खूप अनुभव आहे. त्यामुळे या दोघांपैकी एकाला संघाबाहेर रहावे लागू शकेल. मात्र, या दोघांनाही संघात स्थान मिळावे यासाठी कर्णधार विराट कोहली खालच्या क्रमांकावर खेळण्यास तयार आहे.

एखादा खेळाडू खूप फॉर्मात असणे संघाच्या हिताचेच असते. तुम्हाला सर्वोत्तम खेळाडू उपलब्ध हवे असतात. त्यामुळे पहिल्या सामन्यात रोहित, राहुल आणि धवन हे तिघेही खेळू शकतील. संघात समतोल असणे सर्वात महत्त्वाचे आहे. तिघांनाही संघात स्थान मिळावे यासाठी माझी खालच्या क्रमांकावर खेळण्याची तयारी आहे. फलंदाजीच्या क्रमाने मला काहीही फरक पडत नाही. कर्णधार म्हणून भारतीय संघाची पुढील फळी तयार करण्याची माझ्यावर जबाबदारी आहे. बरेच लोक याबाबत विचार करत नाहीत, असे कर्णधार कोहली सामन्याच्या पूर्वसंध्येला म्हणाला.

भारत-ऑस्ट्रेलिया जगात सर्वोत्तम!

भारत आणि ऑस्ट्रेलिया हे सध्या जगातील सर्वोत्तम संघ आहेत, असे मत विराट कोहलीने व्यक्त केले. तसेच त्याने पुढे सांगितले, या दोन संघांमध्ये समतोल आहे. आम्ही ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्यास खूप उत्सुक आहोत. घरच्या मैदानावर आम्हाला सर्वोत्तम संघांविरुद्ध खेळायचे आहे. आता विश्वचषकाला काहीच महिने शिल्लक आहे. त्यामुळे जास्तीतजास्त मर्यादित षटकांचे सामने खेळणे आमच्यासाठी फायदेशीर ठरेल.