घरक्रीडाधवनची दुखापत इष्टापत्ती ?

धवनची दुखापत इष्टापत्ती ?

Subscribe

दुखापतग्रस्त शिखर धवन वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर पडला आहे. अपेक्षेपेक्षा अधिक वेळ त्याला दुखापतीतून सावरण्यासाठी लागणार असल्यामुळे दिल्लीकर धवन मायदेशी परतेल. त्याच्याऐवजी दिल्ली संघातील त्याचा सहकारी यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतचा भारतीय चमूत समावेश करण्यात येईल. भारतासाठी धोक्याचा इशारा म्हणजे तेज गोलंदाज भुवनेश्वर कुमारची दुखापत. पाकिस्तानविरुध्दच्या सामन्यात जेमतेम १० चेंडू टाकून तो पॅव्हेलियनमध्ये परतला, त्याचे अपुरे षटक विजय शंकरने पूर्ण केलेच, शिवाय वर्ल्डकपमधील पहिल्याच चेंडूवर पाकचा सलामीवर इमा- उल-हकला पायचीत पकडले.

वर्ल्डकपमध्ये भारताचे ५ किंवा ७ सामने (भारत अंतिम फेरीत प्रवेश करेल अशी धारणा आहे) बाकी असताना या संघात १२-१३ फिट खेळाडू आहेत. धवनऐवजी पंतच्या समावेशासाठी आयसीसीला कळविण्यात आले आहे. तेज गोलंदाज भुवनेश्वर कुमारही किमान ३ सामन्यांत खेळू शकणार नाही असे भारतीय संघ व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. केदार जाधव तर आयपीएल स्पर्धेतच दुखापतग्रस्त झाला होता. वर्ल्डकपआधी तो फिट असल्याचे सांगण्यात आले. याआधीचे सर्व सामने केदार खेळला, पण संपूर्ण स्पर्धेदरम्यान केदार फिट राहील? त्याच्या दुखापतीने उचल खाल्ल्यास भारतीय संघाकडे पुरेसे फिट खेळाडू असतील? हे प्रश्न आहेत.

- Advertisement -

शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली हे भारतीय फलंदाजीचे त्रिकूट वनडेमध्ये सातत्यपूर्ण खेळासाठी परिचित आहे. त्यातही धवनचा गेल्या काही स्पर्धांमधील धावांचा वाटाही मोठा. आशिया कप (२०१४, २०१८), वर्ल्डकप (२०१५), चॅम्पियन्स ट्रॉफी (२०१३, २०१७) या स्पर्धांमध्ये धवनने धावांच्या राशी उभारल्या. त्यामुळे वर्ल्डकपमध्ये त्याची उणीव प्रकर्षाने जाणवेल. लोकेश राहुलने पाकविरुध्दच्या सामन्यात अर्धशतक झळकावले. शिवाय रोहितच्या साथीने शतकी सलामीही दिली. कसोटी क्रिकेटमध्ये राहुल सलामीवीराची भूमिका बजावत असल्यामुळे नव्या चेंडूचा मुकाबला करणे त्याला जमते. परंतु, धवनप्रमाणे फटकेबाजी हा त्याचा प्रांत नाही. दमदार फलंदाज असा त्याचा लौकिक असून वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुध्द सलामीच्या सामन्यात तो चौथ्या क्रमांकवर फलंदाजीला आला होता.

राहुल, रोहित सलामीला आल्यामुळे चौथ्या क्रमांकावरील फलंदाजांचे कोडे पांड्याच्या फटकेबाजीमुळे सुटल्यासारखे वाटत असले तरी त्याबाबत निश्चित हमी देता येत नाही. रिषभ पंतच्या समावेशामुळे युवा, फटकेबाज फलंदाजाचा पर्याय कोहलीला उपलब्ध होईल. वर्ल्डकपसाठी भारतीय संघ निवडताना रिषभ पंतला वगळल्यामुळे मनावा प्रसाद यांच्या निवड समितीवर टीका झाली होती. रिकी पाँटिंग, केविन पीटरसन यांनी पंतला वगळल्यामुळे आश्चर्य व्यक्त करताना टीकाही केली होती. धवनच्या दुखापतीमुळे रिषभ पंतला संधी मिळाली असली तरी कोहली त्याचा अंतिम ११ जणांच्या चमूत समावेश करेल का? विजय शंकर, हार्दिक पांड्या ही अष्टपैलूंची जोडी उपलब्ध असताना कोहली त्यांच्याऐवजी रिषभ पंत या निव्वळ फलंदाजाला पसंती देईल का याकडे सार्‍यांचे लक्ष असेल.

- Advertisement -

छोट्या चणीच्या रिषभ पंतने आपल्या छोट्याशा कसोटी कारकिर्दीत दोन शतके (ऑस्ट्रेलिया, इंग्लंड) तसेच दोन अर्धशतके फटकावली आहेत. कसोटी क्रिकेटच्या तुलनेत वनडेतील त्याची कामगिरी लक्षवेधक नाही. एकही अर्धशतक त्याच्या खात्यात जमा नाही. परंतु, दिल्लीच्या या युवा फलंदाजाची फटकेबाजीची ताकद विलक्षण असून संधी मिळाल्यास तो आपली छाप पाडल्यावाचून राहणार नाही.

वर्ल्डकपसारख्या मोठ्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत खेळाडूवर विलक्षण दडपण असेल. शिवाय पंतला दडपणाखाली खेळण्याचा फारसा अनुभव नाही. त्यामुळेच वर्ल्डकपच्या मूळ भारतीय चमूत त्याचा समावेश करण्यात आला नव्हता. त्याच्याऐवजी तामिळनाडूचा अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकची निवड करण्यास आल्याचे निवड समिती प्रमुख प्रसाद यांनी सांगितले होते. मात्र, आता शिखर धवनची दुखापत भारतीय संघासाठी इष्टापत्ती ठरेल?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -