२०११ वर्ल्डकप होईपर्यंत धोनीचा माझ्यावर खूप विश्वास होता, पण… – युवराज

२०११ वर्ल्डकपमध्ये युवराजला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला होता.  

युवराज सिंग आणि धोनी 

भारताचा माजी डावखुरा अष्टपैलू युवराज सिंगने मागील वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. युवराज मागील वर्षी इंग्लंडमध्ये झालेला एकदिवसीय विश्वचषक खेळण्याबाबत आशादायी होता. मात्र, २०१७ नंतर भारतीय संघात स्थान न मिळाल्याने युवराजला या विश्वचषकासाठी संधी मिळणे अवघडच होते. त्याने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीशी याबाबत चर्चाही केली होती. अखेर २०१९ विश्वचषकासाठी संधी मिळणार नाही हे स्पष्ट झाल्यानंतर त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला.

धोनीशी चर्चा केल्यानंतर स्पष्टता मिळाली

मी काही काळ भारतीय संघाच्या बाहेर होतो. त्यानंतर मी पुनरागमनही केले. त्यावेळी कर्णधार असलेल्या विराट कोहलीने मला पाठिंबा दर्शवला होता. त्याच्या पाठिंब्याशिवाय मी पुनरागमन करू शकलो नसतो. मला २०१९ एकदिवसीय विश्वचषकात खेळायला आवडले असते. मात्र, याबाबत धोनीशी चर्चा केल्यानंतर मला अधिक स्पष्टता मिळाली. धोनी त्यावेळी कर्णधार नव्हता. परंतु, निवडकर्ते विश्वचषकासाठी तुझा विचार करणार नाही असे त्याने मला सांगितले. धोनीमुळे माझ्यासमोर खरे चित्र उभे राहिले, असे युवराज म्हणाला.

कर्णधार असताना काही निर्णय घ्यावे लागतात

२०११ विश्वचषकापर्यंत धोनीने मला खूप पाठिंबा दिला होता असेही युवराजने सांगितले. २०११ विश्वचषकापर्यंत धोनीचा माझ्यावर खूप विश्वास होता. ‘तू माझा मुख्य खेळाडू आहेस,’ असे तो मला सांगायचा. मात्र, मी आजारपणातून परतल्यानंतर खेळ खूप बदलला होता आणि संघातही बरेच बदल झाले होते. २०१५ विश्वचषकासाठी माझी संघात का निवड झाली नाही हे सांगणे अवघड आहे. कर्णधार असताना तुम्हाला काही निर्णय घ्यावे लागतात आणि धोनीने तो घेतला, असे युवराजने नमूद केले.