धोनीमुळे सामना गमावण्याची भीती होती

Mumbai
विराट कोहलीची कबुली

अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज महेंद्रसिंग धोनीवर मागील काही काळापासून त्याच्या अखेरच्या षटकांतील संथ फलंदाजीमुळे बरीच टीका झाली आहे. एकेकाळी जगातील सर्वोत्तम फिनिशर म्हणून ओळखल्या जाणार्‍या धोनीच्या क्षमतेवर प्रश्न उठवले जात होते, पण रविवारी रात्री झालेल्या आयपीएलच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणार्‍या धोनीने ४८ चेंडूत ५ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने नाबाद ८४ धावा केल्या.

चेन्नईला अखेरच्या षटकात २६ धावांची गरज असताना त्याने २४ धावा चोपून काढल्या. अखेरच्या चेंडूवर २ धावांची गरज असताना धोनीच्या बॅटला चेंडू लागला नाही आणि चेंडू थेट यष्टीरक्षक पार्थिव पटेलच्या हातात गेला व त्याने शार्दूल ठाकूरला धावचीत केले. त्यामुळे बंगळुरूने १ धावेने हा सामना जिंकला. मात्र, धोनी जसा खेळत होता, त्यामुळे मला आम्ही सामना गमावू अशी भीती वाटली होती, असे सामन्यानंतर बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली म्हणाला.

आम्ही हा सामना कमी धावांच्या फरकाने जिंकला असला तरी सामना जिंकल्याचा मला आनंद आहे. याआधी आम्ही काही सामने कमी धावांच्या फरकाने गमावलेही आहेत. धोनीने अप्रतिम खेळी केली. त्याने तेच केले, जे तो सर्वोत्तम करतो. त्याच्यामुळे आम्ही हा सामना गमावू अशी मला भीती वाटत होती. अखेरच्या चेंडूवर जे झाले (धोनी चेंडू मारू शकला नाही), ते होईल असा मी विचारही केला नव्हता, असे कोहली म्हणाला.

बंगळुरूने चेन्नईला १६२ धावा करू न दिल्यामुळे कोहलीने सामन्यानंतर गोलंदाजांचेही कौतुक केले. आमच्या गोलंदाजांनी खूप संयमाने खेळ केला. १९ व्या षटकापर्यंत तर आम्ही खूपच अप्रतिम गोलंदाजी केली. खासकरून मला नवदीप सैनीचे कौतुक करायचे आहे. पहिल्याच मोसमात त्याने दमदार कामगिरी केली आहे. तो चांगल्या वेगाने गोलंदाजी करत आहे. त्याच्यामुळे संघाला खूप फायदा होत आहे, असे कोहलीने सांगितले.

आयपीएलचा अंतिम सामना हैद्राबादमध्ये

१२ मे रोजी होणारा आयपीएलचा अंतिम सामना चेन्नईऐवजी हैद्राबादला हलवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममधील आय, जे आणि के या तीन प्रेक्षागृहांच्या सुसज्जतेबाबत २०१२ पासून अद्यापपर्यंत स्थानिक महापालिकेकडून प्रमाणपत्र मिळालेले नाही. त्यामुळे हा अंतिम सामना हैद्राबादच्या राजीव गांधी स्टेडियममध्ये खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याआधी होणार्‍या ‘प्ले-ऑफ’ मधील पात्रता फेरी १ चा सामना हा चेन्नईला खेळवण्यात येईल, तर बाद फेरी आणि पात्रता फेरी २ हे दोन सामने विशाखापट्टणम येथे होतील, अशी माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे.