घरक्रीडाधोनी, कोहली चेपॉकच्या खेळपट्टीबाबत नाराज

धोनी, कोहली चेपॉकच्या खेळपट्टीबाबत नाराज

Subscribe

इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) नव्या मोसमाला गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सने विजयी सलामी दिली. या सामन्यात हरभजन सिंग, इम्रान ताहिर आणि रविंद्र जाडेजा यांच्या फिरकीमुळे रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूचा डाव ७० धावांतच आटोपला आणि चेन्नईला हे माफक लक्ष्य गाठण्यासाठी १७.४ षटके लागली. बंगळुरूकडून एकट्या पार्थिव पटेलला दुहेरी धावा करता आल्या, तर चेन्नईकडून अंबाती रायुडूने ४२ चेंडूंत २८ धावा केल्या. टी-२० क्रिकेट म्हणजे मनोरंजन असे समीकरण आहे. मात्र, या चेपॉकच्या संथ खेळपट्टीमुळे चाहत्यांचे मनोरंजन झाले नाहीच, पण खेळाडूंनाही ही खेळपट्टी फारशी आवडली नाही. सामन्यानंतर दोन्ही संघांच्या कर्णधारांनी या खेळपट्टीबाबत नाराजी व्यक्त केली.

विजेता संघ चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी म्हणाला, या खेळपट्टीचा मलाही अंदाज नव्हता. आम्ही या खेळपट्टीवर सराव सामना खेळलो होतो आणि तेव्हा फिरकीला इतकी मदत मिळत नव्हती. त्या सराव सामन्यात मोठी धावसंख्या झाली होती, पण सहसा सराव सामन्यात प्रत्यक्ष सामन्यापेक्षा ३० धावा अधिकच होतात. या खेळपट्टीने आम्हालाही आश्चर्यचकीत केले. दव असतानाही चेंडू प्रचंड फिरकी घेत होता. या खेळपट्टीत सुधारणा होण्याची गरज आहे. जर ही खेळपट्टी अशीच राहिली तर आम्हालाही अडचण येईल. दोन्ही संघांना निदान १४०-१५० धावा तरी करता आल्या पाहिजेत. ८०, ९०, १०० धावा टी-२० मध्ये खूपच कमी आहेत. या पुढील सामन्यात अशी खेळपट्टी आम्हाला नक्कीच नको आहे.

- Advertisement -

तसेच बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली म्हणाला, ही खेळपट्टी सामन्याआधी चांगली वाटत होती. मात्र, यावर फलंदाजी करणे खूपच अवघड होते. मला वाटले होते की, येथे १४०-१५० धावा पुरेशा असतील, कारण नंतर दव पडेल अशी आम्हाला अपेक्षा होती. या स्पर्धेची चांगली सुरुवात झालेली नाही. मात्र, दोन्ही संघ त्याबाबत काही करू शकत नाहीत. ही खेळपट्टी ४ दिवस झाकून ठेवली होती, पण फक्त खेळपट्टीला दोष देऊन चालणार नाही. आम्ही चांगली फलंदाजी केली नाही हेही तितकेच खरे आहे.

गोलंदाजांना मदत असल्यास अडचण काय ? – हरभजन

- Advertisement -

आयपीएलच्या सलामीच्या सामन्यात हरभजन सिंगने ३ विकेट घेत चेन्नई सुपर किंग्सच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे त्याला सामनावीराचा पुरस्कारही मिळाला. या सामन्याच्या खेळपट्टीवर टीका होत असताना हरभजनने मात्र खेळपट्टीकडून गोलंदाजांना मदत मिळत असल्यास अडचण काय, असा सवाल उपस्थित केला आहे. या खेळपट्टीवर फलंदाजी करणे अवघड होते. मात्र, तुम्ही चांगली फलंदाजी करूच शकत नाही इतकेही अवघड नव्हते. चांगल्या खेळपट्टीवर जेव्हा संघ १७०-१८० धावा करतात तेव्हा कोणालाही काही अडचण नसते, पण एखाद्या खेळपट्टीवर गोलंदाजांना मदत असेल तर लोक त्यावर लगेच टीका करतात. क्रिकेटमध्ये गोलंदाजांचेही काम महत्त्वाचे आहे, याचा लोकांना विसर पडला आहे. फलंदाजांनाही कधीतरी थोडी अडचण यायला हवी, असे हरभजन म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -