घरक्रीडाधोनी माझ्यावर खूप चिडला होता !

धोनी माझ्यावर खूप चिडला होता !

Subscribe

आयपीएल संघ चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार आणि भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ’कॅप्टन कूल’ म्हणून ओळखला जातो. सामन्यादरम्यान कितीही दबाव असला तरी तो ते आपल्या चेहर्‍यावर दिसू देत नाही आणि संयमाने खेळ करतो. मात्र, आयपीएलमधील एका सामन्यादरम्यान त्याचे जरा वेगळे रूप पाहायला मिळाले.

मागील शनिवारी किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात धोनी मध्यमगती गोलंदाज दीपक चहरवर चिडलेला दिसला. पंजाबला हा सामना जिंकण्यासाठी १२ चेंडूत ३९ धावांची गरज होती. त्यावेळी चहर गोलंदाजी आला आणि त्याने पहिले दोन चेंडू नो-बॉल टाकले. दुसरा नो-बॉल टाकल्यानंतर धोनी चहरवर चिडलेला दिसला. त्यावेळी नक्की काय झाले याचा खुलासा चहरने आता केला आहे.

- Advertisement -

धोनी त्यावेळी तुला नक्की काय म्हणाला, असे विचारणारे हजारो मेसेज मला आले आहेत. खरे सांगायचे तर धोनी माझ्यावर खूप चिडला होता. जर मी कर्णधार असतो आणि माझ्या गोलंदाजाने असे दोन नो-बॉल टाकले असते, तर मीही चिडलो असतो. मी गोलंदाजीला आलो तेव्हा पंजाबला १२ चेंडूत ३९ धावांची गरज होती आणि नंतर अचानक त्यांना १२ चेंडूतच ३१ धावांची गरज होती. मी त्यावेळी जे चेंडू टाकले, ते धोनीला आवडले नाही आणि तो माझ्यावर चिडला. त्यामुळे मी त्यानंतर दुसर्‍या प्रकारचे चेंडू टाकले, असे चहरने सांगितले. चहरने पहिले २ चेंडू नो-बॉल टाकूनही त्या षटकात १३ धावाच दिल्या आणि त्यामुळे चेन्नईला हा सामना जिंकण्यास मदत झाली.

अखेरच्या षटकांत गोलंदाजी मिळत असल्याचा आनंद

चेन्नईचा गोलंदाज दीपक चहरने आयपीएलच्या मागील आणि यंदाच्या मोसमात सुरुवातीच्या षटकांमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. त्यामुळे कर्णधार महेंद्रसिंग धोनी सुरुवातीलाच त्याची षटके संपवतो. मात्र, ड्वेन ब्रावोला दुखापत झाल्यामुळे चहरला अखेरच्या षटकांमध्ये गोलंदाजी करणे भाग पडत आहे. याविषयी चहर म्हणाला, ब्रावोला दुखापत झाल्यामुळे मला अखेरच्या षटकांत गोलंदाजी करणे भाग पडत आहे. मला याआधी अखेरच्या षटकांमध्ये गोलंदाजी करण्याची फारशी संधी मिळालेली नसली तरी मी यावर खूप मेहनत घेत होतो. मागील २ सामन्यांत कर्णधाराने माझ्यावर अखेरच्या षटकांमध्ये गोलंदाजी करण्याची जबाबदारी टाकली याचा मला आनंद आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -