घरक्रीडाधोनीची सरावाला सुरुवात

धोनीची सरावाला सुरुवात

Subscribe

विंडीजविरुद्ध खेळण्याची शक्यता कमी

भारताचा अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज महेंद्रसिंग धोनी इंग्लंडमध्ये जुलैमध्ये झालेल्या विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय किंवा स्थानिक क्रिकेट खेळलेला नाही. त्याला वगळून भारतीय संघ रिषभ पंत, संजू सॅमसन यांसारख्या युवा खेळाडूंना संधी देण्याचा प्रयत्न करत आहे. या ३-४ महिन्यांमध्ये तो क्रिकेटचा फारसा सराव करतानाही दिसलेला नाही. त्यामुळे धोनी निवृत्त होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात होता.

मात्र, धोनीने आता पुन्हा सरावाला सुरुवात केली आहे. त्याने गुरुवारी रांचीतील जेएससीए स्टेडियममध्ये नेट्समध्ये घाम गाळला. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करु शकेल असे म्हटले जात आहे. मात्र, वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी मर्यादित षटकांच्या मालिकेत तो खेळण्याची शक्यता कमी आहे.

- Advertisement -

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात ३ टी-२० आणि ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. विंडीजच्या या दौर्‍यातील पहिला टी-२० सामना ६ डिसेंबरला मुंबई येथे होणार आहे. मात्र, ’धोनी या मालिकेसाठी उपलब्ध नाही’, अशी माहिती बीसीसीआयच्या एका अधिकार्‍याने शुक्रवारी दिली.

इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारतीय संघाचा न्यूझीलंडने पराभव केला होता. त्यानंतर धोनी एकही सामना खेळलेला नसल्याने त्याच्या भविष्याबाबत सतत चर्चा सुरु आहे. मात्र, धोनीने अजून याबाबत काहीही भाष्य केलेले नाही. भारत आणि बांगलादेश यांच्यात सध्या कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा सामना डे-नाईट (प्रकाशझोतात) होणार असून हा भारताचा पहिलाच डे-नाईट कसोटी सामना असेल. या सामन्यात धोनीने समालोचन करावे अशी प्रसारण करणार्‍या वाहिनीची इच्छा होती. मात्र, धोनी अजूनही खेळाडू म्हणून बीसीसीआयशी करारबद्ध असल्याने त्याला बीसीसीआयकडून परवानगी मिळाली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -