धोनीचे भारतीय संघात पुनरागमन अजूनही शक्य!

मोहम्मद कैफचे मत

Mumbai
Mahendra Singh Dhoni

भारताचा माजी कर्णधार आणि अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज महेंद्रसिंग धोनी मागील वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकानंतर क्रिकेट खेळलेला नाही. त्याने आपला अखेरचा सामना खेळून आता जवळपास वर्ष झाले आहे. त्यामुळे त्याचे भारतीय संघात पुनरागमन अवघड आहे असे अनेकांना वाटते. तसेच यंदाच्या आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केल्यास धोनी राष्ट्रीय संघात परतू शकेल असे भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री काही महिन्यांपूर्वी म्हणाले होते. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. परंतु, धोनीला भारतीय संघात परतण्यासाठी आयपीएलची गरज आहे असे त्याचा माजी सहकारी मोहम्मद कैफला वाटत नाही.

धोनी आता बराच काळ क्रिकेट खेळलेला नाही आणि आयपीएलमुळे त्याला भारतीय संघात पुनरागमन करणे सोपे गेले असते असे अनेकांना वाटते. मात्र, मी या मताशी सहमत नाही. धोनी हा खूप मोठा खेळाडू आहे. सहाव्या-सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना दबावात सामना कसा जिंकवायचा हे त्याला माहित आहे. तो एक मॅचविनर आहे आणि अजूनही खूप फिट आहे. त्यामुळे माझ्यासाठी तो अजूनही प्रमुख खेळाडू आहे, असे कैफ म्हणाला.

तुम्ही एखाद्या खेळाडूला संघातून वगळता, तेव्हा तुमच्याकडे दुसरा खेळाडू तयार असला पाहिजे. मात्र, धोनीची जागा घेऊ शकेल असा खेळाडू आपल्याकडे नाही आणि तो मिळणे फार अवघड आहे. धोनी आपला अखेरचा सामना न्यूझीलंडविरुद्ध विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत खेळला होता. त्या सामन्यात त्याने धावा केल्या होत्या. रविंद्र जाडेजासोबत चांगली भागीदारी रचली होती. त्याच्या या कामगिरीमुळे भारताला सामना जिंकण्याची संधी निर्माण झाली होती, असेही कैफने नमूद केले.

पर्याय उपलब्ध नाही!
भारताने धोनीच्या जागी युवा रिषभ पंतला संधी दिली. मात्र, त्याला धावांसाठी झुंजावे लागले, तर त्याने यष्टिरक्षणातही काही चुका केल्या. त्यामुळे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याच्या जागी लोकेश राहुलने यष्टिरक्षणाची धुरा सांभाळली आणि सर्वांना प्रभावित केले. परंतु, राहुल यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून दीर्घ काळ खेळू शकेल असे कैफला वाटत नाही. धोनीची जागा घेण्यासाठी आपल्याकडे पर्याय उपलब्ध नाही. राहुल यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून दीर्घ काळ खेळू शकेल असे मला वाटत नाही. त्याचा राखीव यष्टीरक्षक म्हणून विचार झाला पाहिजे. पंत आणि संजू सॅमसन यांनाही धोनीची जागा घेता आली नाही. माझ्या मते धोनी अजूनही भारताचा सर्वोत्तम यष्टीरक्षक-फलंदाज असून त्याला संघाबाहेर करण्याची घाई करता कामा नये, असे कैफ म्हणाला.