घरक्रीडाधोनीची होणार निवड, कोहलीला मिळणार विश्रांती?

धोनीची होणार निवड, कोहलीला मिळणार विश्रांती?

Subscribe

आगामी वेस्ट इंडिज दौर्‍यासाठी भारतीय संघाची निवड शुक्रवारी होणार आहे. या दौर्‍यासाठी अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज महेंद्रसिंग धोनी निवड होणार का, याकडे भारतीय चाहत्यांचे लक्ष असणार आहे. तसेच कर्णधार विराट कोहलीच्या उपलब्धतेवरही प्रश्नचिन्ह आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीतील सामन्यात पराभूत झाल्यामुळे भारताचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले. या संघातील केदार जाधव, दिनेश कार्तिक यासारख्या काही खेळाडूंना अपेक्षित कामगिरी करण्यात अपयश आले. त्यामुळे एम. एस. के प्रसाद यांची निवड समिती या खेळाडूंना वगळून युवा खेळाडूंना संधी देण्याची शक्यता आहे.

महेंद्रसिंग धोनीवर मागील एक-दोन वर्षांत संथ फलंदाजीमुळे बरीच टीका झाली आहे. तसेच क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम फिनिशर्सपैकी एक असणार्‍या धोनीला अखेरच्या षटकांत फटकेबाजी करण्यातही वारंवार अपयश येत आहे. ३८ वर्षीय धोनी विश्वचषक संपल्यानंतर निवृत्त होईल, अशी चर्चा केली जात होती. मात्र, त्याने याबाबत अजून काहीही भाष्य केलेले नाही. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये टी-२० विश्वचषक होणार असून या स्पर्धेच्या तयारीसाठी युवा रिषभ पंतला अधिकाधिक संधी देण्याचा निवड समिती प्रयत्न करण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास धोनीचे संघातील स्थान धोक्यात येऊ शकेल. मागील वर्षी झालेल्या वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी धोनीची भारतीय संघात निवड झाली नव्हती. नुकत्याच झालेल्या विश्वचषकात सलामीवीर शिखर धवनला दुखापत झाल्यामुळे पंतला भारतीय संघात स्थान मिळाले. त्याने चौथ्या क्रमांकावर खेळताना काही चांगल्या खेळी केल्या. त्यामुळे त्याची एकदिवसीय, टी-२० आणि कसोटी या तिन्ही संघात निवड होणार हे जवळपास निश्चित आहे.

- Advertisement -

कर्णधार कोहली आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हे भारताचे प्रमुख खेळाडू मागील काही काळापासून सातत्याने तिन्ही प्रकारांमध्ये, तसेच आयपीएलमध्ये खेळत असल्याने त्यांना मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी विश्रांती मिळू शकेल. मात्र, भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचे पहिले दोन सामने या दौर्‍यात खेळणार असल्याने हे दोघेही या मालिकेत खेळणार अशी अपेक्षा आहे. एकदिवसीय संघातील चौथ्या क्रमांकाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. त्यामुळे युवा शुभमन गिल, मयांक अगरवाल, श्रेयस अय्यर किंवा मनीष पांडे यांची संघात निवड होऊ शकेल. गोलंदाजांमध्ये नवदीप सैनी, खलील अहमद, दीपक चहर आणि राहुल चहर यांचा विचार होण्याची शक्यता आहे.

३ ऑगस्टपासून सुरू होणार्‍या या दौर्‍यात भारतीय संघ ३ टी-२०, ३ एकदिवसीय आणि २ कसोटी सामने खेळणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -