IPL 2020 : दिनेश कार्तिकने सोडले KKRचे कर्णधारपद; मॉर्गन करणार नेतृत्व 

फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी म्हणून कार्तिकने कर्णधारपद सोडले आहे.

दिनेश कार्तिक

यंदाच्या आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघ (KKR) आणि या संघाचा कर्णधार दिनेश कार्तिकला सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे कार्तिकने आता केकेआरचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या जागी इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन आयपीएलच्या उर्वरित सामन्यांत केकेआरचे नेतृत्व करेल. फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी म्हणून कार्तिकने कर्णधारपद सोडले आहे. केकेआर संघ सध्या आयपीएलच्या गुणतक्त्यात चौथ्या स्थानावर असून त्यांनी सात पैकी चार सामने जिंकले आहेत.

कार्तिकचा हा निर्णय अपेक्षित नव्हता

‘कार्तिकसारखा कर्णधार लाभणे हे केकेआरचे भाग्य होते. तो नेहमीच स्वतःच्या आधी संघाचा विचार करतो. कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेण्यासाठी खूप हिंमत लागते. कार्तिकचा हा निर्णय आम्हाला अपेक्षित नव्हता. आम्हाला त्याच्या निर्णयाचे आश्चर्य वाटले असले तरी आम्ही त्याच्या निर्णयाचा आदर करतो. आता यापुढे इयॉन मॉर्गन आमच्या संघाचे नेतृत्व करेल, जो आतापर्यंत उपकर्णधारपद भूषवत होता. मॉर्गन हा वर्ल्डकप विजेता कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात इंग्लंडने २०१९ वर्ल्डकप जिंकला होता,’ असे केकेआरचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेंकी म्हैसूर म्हणाले.

कर्णधार म्हणून काही चुका केल्या

कार्तिकला यंदाच्या मोसमात चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्याला ७ सामन्यांत केवळ १०८ धावाच करता आल्या असून यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. त्याने किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध २९ चेंडूत ५८ धावांची खेळी केली होती. त्यातच त्याने कर्णधार म्हणूनही काही चुका केल्या आहेत. त्यामुळे त्याच्यावर बरीच टीकाही झाली आहे.