US OPEN : डॉमिनिक थीम, मेदवेदेव्हचा उपांत्य फेरीत प्रवेश 

उपांत्य फेरीत थीम विरुद्ध मेदवेदेव्ह असा सामना होईल.  

medvedev and thiem
डॅनिल मेदवेदेव्ह आणि डॉमिनिक थीम

ऑस्ट्रियाचा डॉमिनिक थीम आणि रशियाचा डॅनिल मेदवेदेव्ह या अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या सीडेड खेळाडूंनी अमेरिकन ओपन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत थीमने ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅलेक्स डी मिनाऊरचा, तर मेदवेदेव्हने आंद्रेय रुबलेव्हचा पराभव केला. मेदवेदेव्ह आणि रुबलेव्ह हे दोघेही रशियाचे खेळाडू असून लहानपणापासून मित्र आहेत. मात्र, या सामन्यापुरती त्यांना ही मैत्री विसरावी लागली.

सरळ सेटमध्ये विजयी 

दोन रशियन खेळाडूंमध्ये झालेल्या या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मेदवेदेव्हने रुबलेव्हवर ७-६(६), ६-३, ७-६(५) अशी सरळ सेटमध्ये मात केली. रुबलेव्हने या सामन्यात झुंजार खेळ केला, पण तो विजयासाठी पुरेसा नव्हता. मेदवेदेव्हने दमदार खेळ करत सलग दुसऱ्यांदा अमेरिकन ओपनची उपांत्य फेरी गाठली. त्याने यंदाच्या अमेरिकन ओपनमध्ये एकही सेट गमावलेला नाही आणि अशी कामगिरी करणारा तो एकमेव खेळाडू आहे. आता उपांत्य फेरीत त्याचा सामना डॉमिनिक थीमशी होईल. थीमने उपांत्यपूर्व फेरीत डी मिनाऊरचा ६-१, ६-२, ६-४ असा पराभव केला. या सामन्यात थीमने ७ वेळा डी मिनाऊरची सर्विस मोडली.

अझारेंका-सेरेना आमनेसामने

बेलारुसच्या व्हिक्टोरिया अझारेंकाला अमेरिकन ओपनची उपांत्य फेरी गाठण्यात यश आले. महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत तिने बेल्जियमच्या एलिस मर्टेन्सचा ६-१, ६-० असा धुव्वा उडवला. आता उपांत्य फेरीत अझारेंका आणि अमेरिकेची महान टेनिसपटू सेरेना विल्यम्स आमनेसामने येणार आहेत. अझारेंकाने आतापर्यंत एकदाही अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकलेली नाही.