US OPEN : सुमित नागलची अपयशी झुंज; दुसऱ्या फेरीत डॉमिनिक थीमविरुद्ध पराभूत 

थीमने नागलवर ३-६, ३-६, २-६ अशी मात केली.

सुमित नागल

भारताचा युवा टेनिसपटू सुमित नागल हा त्याच्या झुंजार खेळासाठी ओळखला जातो. त्याने अमेरिकन ओपन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेत मागील वर्षी महान रॉजर फेडररविरुद्ध अप्रतिम खेळ केला होता. यंदाही त्याने या स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थीमविरुद्ध झुंजार खेळ केला. मात्र, त्याची ही झुंज अपयशी ठरली. दुसऱ्या सीडेड थीमने नागलवर ३-६, ३-६, २-६ अशी मात केली. थीमला यंदाची स्पर्धा जिंकण्यासाठी दावेदार मानले जात आहे.

नागलची कौतुकास्पद कामगिरी  

नागल या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत गारद झाला असला तरी त्याची कामगिरी कौतुकास्पद ठरली. ग्रँड स्लॅम स्पर्धेत एकेरीची दुसरी फेरी गाठणारा नागल हा मागील सात वर्षांतील पहिला भारतीय खेळाडू ठरला होता. दुसऱ्या फेरीच्या सामन्यात थीमने सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला, तर नागलनेही झुंज देत थीमवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पहिल्या सेटमध्ये ३-३ अशी बरोबरी झाली होती. मात्र, यानंतर थीमने त्याचा खेळ उंचावत सलग तीन गेम जिंकत पहिला सेट ६-३ असा खिशात टाकला. थीमने त्यानंतरही आपला चांगला खेळ सुरु ठेवत दुसरा सेट ६-३ असा जिंकला. तिसऱ्या सेटमध्ये नागलने पुन्हा झुंज देण्याचा प्रयत्न केला. त्याने एकदा ‘मॅच पॉईंट’ही वाचवला. मात्र, थीमने पुढचा गेम जिंकत तिसरा सेट ६-२ असा जिंकला आणि या स्पर्धेत आगेकूच केली.

अजून खूप काही शिकायचेय

‘धन्यवाद अमेरिकन ओपन २०२०. मला अजून खूप काही शिकायचे आहे. मी पुढेही मेहनत घेत राहणार आहे,’ अशा शब्दांत सुमितने दुसऱ्या फेरीतील पराभवानंतर आपल्या भावना ट्विटरवर मांडल्या. सुमितला अमेरिकन ओपनमध्ये सिडींगही मिळाले नव्हते. परंतु, त्याने थीमसारख्या खेळाडूविरुद्ध झुंजार खेळ करत त्याच्यातील प्रतिभा दाखवून दिली.