द्रविडने हितसंबंध जपले नाहीत!

Mumbai
rahul dravid
राहुल द्रविड

भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडने हितसंबंध जपले नाहीत, असे बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने मंगळवारी स्पष्ट केले. त्यामुळे तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (एनसीए) अध्यक्षपद भूषवू शकणार आहे. मात्र, याबाबतचा अखेरचा निर्णय बीसीसीआयचे लोकपाल निवृत्त न्यायमूर्ती डी. के. जैन घेतील, असे प्रशासकीय समितीचे नवे सदस्य लेफ्टिनेंट जनरल रवी थोडगे यांनी सांगितले.

द्रविडने हितसंबंध जपले नाहीत. त्याला नोटीस बजावण्यात आली होती, पण आम्ही त्याला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे अध्यक्षपद भूषवण्यास परवानगी दिली आहे. द्रविडने हितसंबंध जपल्याचे आमच्या निदर्शनास आले नाही. लोकपालांना याबाबत काही आढळून आले, तर आम्हाला द्रविडवरील हितसंबंधाचे आरोप का चुकीचे वाटले याबाबतची त्यांना माहिती देऊ, असे थोडगे म्हणाले. तसेच द्रविडला एनसीएचे अध्यक्षपद भूषवण्यासाठी इंडियन सिमेंट उद्योग समूहातील उपाध्यक्षपद सोडावे लागेल किंवा सुट्टी घ्यावी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे सदस्य संजीव गुप्ता यांनी बीसीसीआयकडे द्रविडविरोधात तक्रार केली होती. यात द्रविडवर हितसंबंध जपल्याचा आरोप ठेवण्यात आला. द्रविड एनसीएच्या अध्यक्षपदासोबतच इंडियन सिमेंट उद्योग समूहात (आयपीएल संघ चेन्नई सुपर किंग्स त्यांच्या मालकीचा आहे) उपाध्यक्षपदावर काम करतो, या मुद्यावरून गुप्ता यांनी तक्रार केली. यानंतर द्रविडला लोकपालांनी नोटीस बजावली.