‘डीआरएस’ चा वापर योग्यप्रकारे होत नाही!

Mumbai
शेन वॉर्न

क्रिकेटमध्ये डीआरएसचा (डिसिजन रिव्युव्ह सिस्टम) वापर नेहमीच चर्चेत असतो. काही वर्षांपूर्वीपर्यंत बीसीसीआय डीआरएसच्या विरोधात होता. डीआरएसच्या निर्मितीचा उद्देश हा पंचांच्या निर्णयांमधील चुका कमी करणे हा होता. मात्र, अजूनही या प्रक्रियेत बर्‍याच चुका होताना दिसतात.

काही दिवसांपूर्वीच भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसर्‍या टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा फलंदाज डॅरेल मिचेलला पंचानी पायचीत दिल्यानंतर त्याने डीआरएसचा वापर केला. त्यावेळी चेंडू त्याच्या पॅडला लागण्याआधी बॅटला लागल्याचे दिसले. पण, तरीही तिसर्‍या पंचांनी त्याला बाद ठरवले. त्यामुळे पुन्हा एकदा डीआरएसच्या वापरावर बरीच टीका झाली होती. आता ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्ननेही डीआरएसवर टीका केली आहे. या प्रक्रियेचा वापर योग्यप्रकारे होत नाही, असे त्याचे मत आहे.

मी डीआरएसचा चाहता आहे, जर त्याचा वापर योग्यपणे होत असेल तरच, पण सध्यातरी त्याचा वापर योग्यपणे होताना दिसत नाही. मला वाटते की सध्या डीआरएसचा वापर उगीचच कठीण करून ठेवला आहे. डीआरएसचा वापर करताना पंचाने दिलेल्या मूळ निर्णयाचा विचार करता कामा नये. बर्‍याचदा दोन सारख्याच चेंडूना कधी बाद दिले जाते, तर कधी नाबाद दिले जाते, असे असून चालणार नाही. फलंदाजाला बाद असेल तर बाद, नाबाद असेल तर नाबाद दिले पाहिजे. मात्र, बर्‍याचदा पंचांच्या मूळ निर्णयानुसारच डीआरएसचा निर्णय दिला जातो. त्यामुळेच या प्रक्रियेच्या वापरात बर्‍याच चुका होत आहेत, असे वॉर्न म्हणाला.

भारतासाठी धोनीचा अनुभव खूप महत्त्वाचा !

शेन वॉर्नच्या मते भारताला जर यावर्षी इंग्लंडमध्ये होणारा विश्वचषक जिंकायचा असेल तर त्यांच्यासाठी महेंद्रसिंग धोनीचा अनुभव खूप महत्त्वाचा आहे. भारताला जर विश्वचषक जिंकायला असेल तर संघात महेंद्रसिंग धोनीसारखा खेळाडू असायला हवा. धोनी कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. तो उत्कृष्ट यष्टीरक्षक आहे. त्याचबरोबर धोनीचा अनुभव हा संघासाठी फार महत्त्वाचा ठरू शकतो. माझ्या मते हा विश्वचषक जिंकण्याचे भारत आणि इंग्लंड प्रबळ दावेदार आहेत, असे वॉर्न म्हणाला.