घरक्रीडादुर्गामाता , श्रीराम , एस. एस. जी. फाऊंडेशन, सह्याद्री उपांत्य फेरीत

दुर्गामाता , श्रीराम , एस. एस. जी. फाऊंडेशन, सह्याद्री उपांत्य फेरीत

Subscribe

दुर्गामाता स्पोर्ट्स, एस. एस. जी. फाऊंडेशन या दोन मुंबईच्या संघाबरोबर उपनगरचा सह्याद्री मित्र मंडळ आणि पालघरच्या श्रीराम संघाने जयदत्त क्रीडा मंडळ आयोजित “स्वप्नसाफल्य चषक” कुमार गट कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली. दुर्गामाता स्पोर्ट्स विरुद्ध श्रीराम संघ आणि एस. एस. जी. फाऊंडेशन विरुद्ध सह्याद्री मित्र मंडळ अशा उपांत्य लढती होतील. महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. आणि मुंबई शहर कबड्डी असो. च्या मान्यतेने प्रभादेवी, स्व.राजाराम साळवी उद्यानातील “स्व.किरण बाळू शेलार क्रीडांगणावर झालेल्या पहिल्या उपांत्यपूर्व फेरीत मुंबईच्या दुर्गामाता स्पोर्ट्सने उपनगरच्या जागर स्पोर्ट्सचा ३७-२५असा निकाल लावत उपांत्य फेरी गाठली.

मध्यांतरापर्यंत अत्यंत चुरशीने खेळला गेलेल्या या सामन्यात दुर्गामाताकडे १३-१२अशी नाममात्र आघाडी होती. या डावात दोन्ही संघाकडून लोणची नोंद झालेली नाही. मध्यांतरानंतर मात्र दुर्गामाताच्या प्रथमेश पालांडे,किरण कदम यांनी आपला खेळ अधिक गतिमान करीत हा विजय साकारला. जागर स्पोर्ट्सला देखील बाजू परतविण्याची संधी आली होती. पण त्या संधीचा लाभ उठविण्यास ते असमर्थ ठरले. जागरकडून कल्पेश मांडवकर,ओमकार पिल्ले यांचा चमकदार खेळ संघाचा पराभव टाळू शकला नाही. पालघरच्या श्रीराम संघाने अत्यंत चुरशीच्या लढतीत मुंबईच्या विकास मंडळाला ३९-२७ अशी धूळ चारली.

- Advertisement -

आक्रमक सुरुवात करीत विकासाच्या अवधूत शिंदेने श्रीराम संघाचे शिलकी ४ गडी एकाच चढाईत बाद करीत लोण दिला व १४-०६अशी आघाडी घेतली.मध्यांतराला १९-१३अशी आघाडी विकासाकडे होती.मध्यांतरानंतर मात्र श्रीरामच्या प्रतीक जाधवने आपल्या फसव्या चढाईत गुण घेण्याचा सपाटा लावला. यात त्याला अविनाश पालयेने चढाईत, तर अक्षय अवरेने पकडीत उत्तम साथ दिल्यामुळे श्रीरामने विकासवर २ लोण चढवित आपली आघाडी भक्कम केली. विकासच्या अवधूत शिंदेला अन्य सहकार्‍याची साथ न लाभल्याने मोठ्या पराभवाला सामोरी जावे लागले. एस. एस. जी. फाउंडेशनने पहिल्या डावातील १६-१९अशा ३ गुणांच्या पिछाडीवरून सिद्धीप्रभाचे कडवे आव्हान ४०-३८असे संपुष्टात आणले. ओमकार पवार, ओमकार ढवळे यांनी आक्रमक सुरूवात करीत विश्रांतीपर्यंत सिद्धीप्रभाला आघाडी मिळवून दिली होती.

पण ती त्यांना टिकविता आली नाही. एस. एस. जी. च्या पंकज मोहिते, सर्वेश चाचे यांनी विश्रांतीनंतर जोरदार आक्रमक करीत संघाला उपांत्य फेरी गाठून दिली. शेवटच्या सामन्यात उपनगरच्या सह्याद्री मित्र मंडळाने मुंबईच्या जय दत्तगुरुचा ३५-२३असा पराभव करीत आगेकूच केली. मध्यांतराला १५-११अशी आघाडी घेणार्‍या सह्याद्रीकडून भारत कलगुटकर, प्रणय रुपये उत्कृष्ट खेळले. जय दत्तगुरूंच्या मोनू कांडु, अक्षय उपाध्याय यांचा खेळ संघाला विजय मिळविण्यास साजेसा नव्हता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -