युवकांना जास्तीतजास्त संधी देण्याचा प्रयत्न -शास्त्री

Mumbai
Ravi Shashtri
रवी शास्त्री

पुढील वर्षी होणारा टी-२० विश्वचषक आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा लक्षात घेऊन युवा खेळाडूंना जास्तीतजास्त संधी देण्याचा मी प्रयत्न करणार आहे, असे विधान भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केले. काही दिवसांपूर्वीच शास्त्री यांची भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी फेरनिवड झाली होती. आता आगामी काळात भारतीय संघात कोणते बदल करायचे याबाबत त्यांनी योजना आखली आहे.

टी-२० विश्वचषकाला आता १२ महिने बाकी आहेत आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याला १८-२० महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. या काळामध्ये युवा खेळाडूंना जास्तीतजास्त संधी देण्याचा माझा प्रयत्न असेल. युवा खेळाडूंना अनुभवी खेळाडूंसोबत खेळायला मिळाल्यास त्यांच्या खेळात सुधारणा होईल आणि त्यामुळे आमचा संघ अधिक मजबूत होईल. आगामी काळात आमच्या संघात काही बदल होतील. युवा खेळाडूंना सामने खेळण्याची संधी मिळाल्यास आमच्या राखीव खेळाडूंची फळी मजबूत होईल. मात्र, त्यांना संधी देत असतानाच सामने जिंकत राहणेही महत्त्वाचे आहे, असे शास्त्री म्हणाले.

विंडीज दौर्‍यातील कामगिरी खास!
भारताने नुकत्याच झालेल्या विंडीज दौर्‍यात एकही सामना गमावला नाही. याबाबत प्रशिक्षक शास्त्री यांनी सांगितले, वेस्ट इंडिजला वेस्ट इंडिजमध्ये क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये पराभूत करणे सोपे नाही. आम्ही या दौर्‍यात केलेली कामगिरी खास होती. भारत ’अ’ संघानेही वेस्ट इंडिज दौर्‍यात एकही सामना गमावला नाही, जे यापूर्वी कधी घडले आहे असे मला वाटत नाही.