धोनीची घरवापसी नाहीच; बीसीसीआयने वार्षिक करारातून वगळले!

महेंद्रसिंह धोनी भारतीय क्रिकेट संघात कधी परतणार अशी आस लावून बसलेल्या धोनीच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. धोनी या पुढे भारतीय संघात परतणार नाही असेच काहीसे संकेत बीसीसीआयने दिले आहेत. नुकतीच बीसीसीआयने २०१९-२० या वर्षासाठी क्रिकेटपटूंसोबतचे करार जाहीर केले आहेत. ऑक्टोबर २०१९ ते सप्टेंबर २०२० या कालावधीसाठी क्रिकेटपटूंना देण्यात येणारे मानधन बीसीसीआयने जाहीर केले. यात ग्रेड ‘ए प्लस’ मध्ये म्हणजे सर्वाधिक मानधन मिळणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये तिघांचा समावेश करण्यात आला आहे.मात्र यादीतून धोनीला वगळण्यात आले आहे.

क्रिकेटपटूंना देण्यात येणाऱ्या मानधनाचे ग्रेड ए प्लस, ए, बी आणि सी अश्या चार प्रकारात विभागणात आले आहेत. ‘ए प्लस’मध्ये असलेल्या क्रिकेटपटूंना ७ कोटी, ‘ए’ ग्रेटमधील खेळाडूंना ५ कोटी, ‘बी’ ग्रेटमधील खेळाडूंना ३ कोटी तर अखेरच्या ‘ग्रेड सी’मधील खेळाडूंना १ कोटी मानधन दिले जाणार आहे.

करारातून धोनी गायब

बीसीसीआयने जाहीर केलेल्या यादीत धोनीचे नाव वगळण्यात आले आहे. गेले अनेक दिवस धोनी क्रिकेटपासून दूर आहे. गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेत धोनी शेवटचा सामना खेळला होता.

ए प्लस, ए ग्रेड मध्ये या खेळाडूंचा समावेश

बीसीसीआयने जाहीर केलेल्या यादीनूसार भारताचा कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा आणि भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या तिघांचा समावेश आहे. तर ‘ए ग्रेड’मध्ये आर.अश्विन, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, शिखर धवन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, कुलदीप यादव, ऋषभ पंत यांचा समावेश करण्यात आला आहे.

बी आणि सी ग्रेडमध्ये हे खेळाडू

बी’ मध्ये वृद्धीमान सहा, उमेश यादव, यजुवेंद्र चहल, हार्दिक पंड्या, मयांक अग्रवाल हे खेळाडू आहेत. तिसऱ्या म्हणजेच ‘ग्रेड सी’मध्ये केदार जाधव, नवदीप सैनी, दीपक चहर, मनिष पंड्या, हनुमान विहारी, शादुर ठाकूर, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर यांचा समावेश आहे.