ODI : ऑस्ट्रेलियाचा निराशाजनक पराभव; दुसऱ्या वनडेत इंग्लंड २४ धावांनी विजयी 

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेत आता १-१ बरोबरी झाली आहे. 

england vs australia

मधल्या फळीतील फलंदाजांच्या खराब कामगिरीचा फटका ऑस्ट्रेलियाला बसला. इंग्लंडविरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला २३२ धावांचे आव्हान मिळाले. याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया २ बाद १४४ असा सुस्थितीत होता. मात्र,  यानंतर त्यांनी अवघ्या तीन धावांत चार विकेट गमावल्या. अखेर त्यांचा डाव २०७ धावांत आटोपला आणि इंग्लंडने हा सामना २४ धावांनी जिंकला. या विजयासह इंग्लंडने तीन सामन्यांच्या या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे.

झॅम्पाचा भेदक मारा  

या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांनी पहिल्या दोन विकेट २९ धावांत गमावल्या. यानंतर जो रूट (३९) आणि इयॉन मॉर्गन (४२) यांनी सावध फलंदाजी केली. मात्र, या दोघांनाही लेगस्पिनर झॅम्पाने बाद करत इंग्लंडला अडचणीत टाकले. अखेरच्या षटकांत क्रिस वोक्स (२६), टॉम करन (३७) आणि आदिल रशिद (३५) यांनी चांगली फलंदाजी केल्याने इंग्लंडने ५० षटकांत ९ बाद २३१ अशी धावसंख्या उभारली.

कर्णधार फिंचचे अर्धशतक 

२३२ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची २ बाद ३७ अशी अवस्था होती. कर्णधार अॅरॉन फिंच (७३) आणि मार्नस लबूशेन (४८) यांनी तिसऱ्या विकेटसाठी १०७ धावांची भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. हे दोघे बाद झाल्यावर मात्र अॅलेक्स कॅरी (३६) वगळता ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी निराशाजनक खेळ केला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा डाव २०७ धावांत आटोपला.


संक्षिप्त धावफलक – इंग्लंड : ५० षटकांत ९ बाद २३१ (मॉर्गन ४२; झॅम्पा ३/३६) विजयी वि. ऑस्ट्रेलिया : ४८.४ षटकांत सर्वबाद २०७ (फिंच ७३; वोक्स ३/३२, आर्चर ३/३४, सॅम करन ३/३५).