घरक्रीडामलानचे झंझावाती शतक; इंग्लंडची न्यूझीलंडवर मात

मलानचे झंझावाती शतक; इंग्लंडची न्यूझीलंडवर मात

Subscribe

डाविड मलानचे झंझावाती शतक आणि त्याला कर्णधार इयॉन मॉर्गनने दिलेली अप्रतिम साथ यामुळे इंग्लंडने चौथ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा ७६ धावांची पराभव केला. त्यामुळे इंग्लंडने या मालिकेत २-२ अशी बरोबरी केली. मलानने या सामन्यात ५१ चेंडूत ९ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने नाबाद १०३ धावांची खेळी केली. हे त्याचे टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलचे शतक होते. त्याने हे शतक अवघ्या ४८ चेंडूत पूर्ण केले. त्यामुळे इंग्लंडकडून टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करण्याचा विक्रम त्याने आपल्या नावे केला.

नेपियर येथे झालेल्या चौथ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार टीम साऊथीने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. मात्र, त्याचा हा निर्णय न्यूझीलंडच्या गोलंदाजांना योग्य ठरवता आला नाही. इंग्लंडच्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर जॉनी बेअरस्टोला अवघ्या ८ धावांवर डावखुरा फिरकीपटू मिचेल सँटनरने बाद केले. मात्र, दुसरा सलामीवीर टॉम बँटनने आक्रमक फलंदाजी सुरू ठेवली. त्याने ४ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३१ धावा केल्यावर त्यालाही सँटनरने पायचीत पकडले. त्याने आणि मलानने दुसर्‍या विकेटसाठी ४२ धावा जोडल्या. यानंतर फलंदाजीला आलेल्या कर्णधार मॉर्गनने मलानच्या साथीने न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई करण्यास सुरुवात केली. मलानने ३१ चेंडूत, तर मॉर्गनने २१ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. ९ टी-२० सामने खेळणार्‍या मलानची ५० किंवा त्यापेक्षा जास्त धावा करण्याची ही सहावी वेळ होती.

- Advertisement -

अर्धशतक पूर्ण झाल्यावर या दोघांनी धावांची गती अधिकच वाढवली. लेगस्पिनर ईश सोधी टाकत असलेल्या १७ व्या षटकात मलानने दोन चौकार आणि तीन षटकार ठोकत २८ धावा चोपून काढल्या. पुढच्याच षटकात आणखी दोन षटकार लगावत मलानने आपले पहिले टी-२० शतक पूर्ण केले. मॉर्गनला मात्र आपले शतक झळकावता आले नाही. अखेरच्या षटकात ९१ धावांवर त्याला साऊथीने माघारी पाठवले. त्याने आणि मलानने तिसर्‍या विकेटसाठी १८२ धावांची भागीदारी केली. ही इंग्लंडसाठी सर्वोत्तम भागीदारी आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे इंग्लंडने निर्धारित २० षटकांत ३ बाद २४१ अशी धावसंख्या उभारली.

याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचे सलामीवीर मार्टिन गप्टिल आणि कॉलिन मुनरो यांनी आक्रमक सुरुवात केली. त्यांनी पाच षटकांच्या आतच संघाच्या ५० धावा फलकावर लावल्या. परंतु, टॉम करनने गप्टिलला २७ धावांवर बाद करत ही जोडी फोडली. तिसर्‍या क्रमांकावरील टीम सायफर्टला केवळ ३ धावाच करता आल्या. यानंतर नवखा लेगस्पिनर मॅट पार्किन्सनच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात कॉलिन डी ग्रँडहोम (७) आणि मुनरो (३०) सलग दोन चेंडूंवर बाद झाले. यानंतरही इंग्लंडच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केल्याने रॉस टेलर (१४), सँटनर (१०) आणि साऊथी (३९) वगळता न्यूझीलंडच्या इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. त्यामुळे न्यूझीलंडचा डाव १६५ धावांवर आटोपला. इंग्लंडकडून पार्किन्सनने ४, तर क्रिस जॉर्डनने २ गडी बाद केले.

- Advertisement -

संक्षिप्त धावफलक – इंग्लंड : २० षटकांत ३ बाद २४१ (डाविड मलान नाबाद १०३, इयॉन मॉर्गन ९१, टॉम बँटन ३१; मिचेल सँटनर २/३२) विजयी वि. न्यूझीलंड : १६.५ षटकांत सर्वबाद १६५ (टीम साऊथी ३९, कॉलिन मुनरो ३०, मार्टिन गप्टिल २७; मॅट पार्किन्सन ४/४७).

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -