घरक्रीडाइंग्लंडचा मालिका विजय

इंग्लंडचा मालिका विजय

Subscribe

सलामीवीर जेसन रॉय आणि अष्टपैलू बेन स्टोक्सच्या उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने चौथ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचा ३ विकेट राखून पराभव केला. या विजयामुळे इंग्लंडने पाच सामन्यांच्या या एकदिवसीय मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी मिळवली आहे. या मालिकेचा पहिला सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता. तिसर्‍या सामन्याप्रमाणेच या सामन्यातही पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ३०० धावांचा टप्पा पार केला होता. मात्र, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातील खराब प्रदर्शनामुळे त्यांनी हा सामनाही गमावला.

मागील सामन्यात षटकांची गती न राखल्याने इयॉन मॉर्गनवर बंदी घालण्यात आली होती आणि त्यामुळे या सामन्यात जॉस बटलरने इंग्लंडचे नेतृत्त्व केले. त्याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. मागील सामन्यातील शतकवीर इमाम-उल-हकच्या कोपराला चेंडू लागल्याने त्याला मैदानाबाहेर जावे लागले. यानंतर फलंदाजीला आलेल्या बाबर आझम आणि फखर झमान यांनी अप्रतिम फलंदाजी केली. या दोघांनीही डावाच्या १८व्या षटकात आपले अर्धशतक पूर्ण केले. हे अर्धशतक करण्यासाठी आझमने ४९ चेंडू तर झमानने ४४ चेंडू घेतले. अखेर २०व्या षटकात पाकिस्तानची धावसंख्या ११६ असताना ५७ धावांवर खेळणार्‍या झमानला बाद करत टॉम करनने इंग्लंडला पहिले यश मिळवून दिले.

- Advertisement -

मात्र, आझमने आपली चांगली फलंदाजी सुरु ठेवली. त्याने अनुभवी मोहम्मद हाफिजच्या साथीने दुसर्‍या विकेसाठी १०४ धावांची भागीदारी केली. हाफिजने ५५ चेंडूत ५९ धावा केल्यानंतर त्याला मार्क वूडने माघारी पाठवले. या पुढच्याच षटकात आझमने आपले शतक पूर्ण केले. हे त्याचे एकदिवसीय क्रिकेटमधील नववे शतक होते. यानंतर धावांची गती वाढवण्याच्या नादात तो ११५ धावांवर बाद झाला. या धावा त्याने ११२ चेंडूत १३ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने केल्या. पुढे अखेरच्या षटकांत शोएब मलिक (२६ चेंडूत ४१) आणि कर्णधार सर्फराज अहमदने (१४ चेंडूत २१) चांगली फटकेबाजी केल्यामुळे पाकिस्तानने ५० षटकांत ७ विकेट गमावत ३४० इतकी धावसंख्या उभारली.

याचा पाठलाग करताना इंग्लंडचे सलामीवीर जेसन रॉय आणि जेम्स विन्स यांनी आक्रमक सुरुवात केली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी ९४ धावांची भागीदारी केली. १४व्या षटकात युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद हसनैनने विन्सला ४३ धावांवर बाद करत ही जोडी फोडली. २ चेंडूनंतर रॉयने चौकार लगावत आपले अर्धशतक पूर्ण केले. यानंतर त्याने अधिकच आक्रमक फलंदाजी करत ७५ चेंडूत आपले एकदिवसीय क्रिकेटमधील आठवे शतक पूर्ण केले. ११४ धावांवर असताना रॉयला हसनैनच माघारी पाठवले.

- Advertisement -

यानंतर जो रूट (३६), बटलर (०) आणि मोईन अली (०) झटपट बाद झाल्याने इंग्लंडची अवस्था ५ बाद २१६ अशी झाली होती. तर जो डेंलीने (१७) काही काळ चांगली फलंदाजी केल्यानंतर त्याला जुनेद खानने माघारी पाठवले. मात्र, पुढे बेन स्टोक्सने तळाच्या टॉम करन (३१) आणि आदिल रशीद (१२) यांना हाताशी घेऊन अप्रतिम फलंदाजी करत इंग्लंडला अखेरच्या षटकात विजय मिळवून दिला. स्टोक्सने ६४ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ७१ धावांची खेळी केली.

संक्षिप्त धावफलक –
पाकिस्तान : ५० षटकांत ७ बाद ३४० (बाबर आझम ११५, हाफिज ५९, झमान ५७; टॉम करन ४/७५) पराभूत वि. इंग्लंड : ४९.३ षटकांत ७ बाद ३४१ (जेसन रॉय ११४, बेन स्टोक्स नाबाद ७१; इमाद वसिम २/६२).

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -