घरक्रीडाइंग्लंडचे स्वप्न साकार!

इंग्लंडचे स्वप्न साकार!

Subscribe

वर्ल्डकप जेतेपदाचे इंग्लंडचे स्वप्न साकार झाले. परंतु त्यासाठी त्यांना कडवा संघर्ष करावा लागला. न्यूझीलंडने दिलेली झुंजही कौतुकास्पद! दोन्ही संघांनी ५० षटकांत २४१ धावा, सुपर ओव्हरमध्ये १५ धावा केल्यामुळे सामना बरोबरीत सुटला. अखेर ही कोंडी फुटली ती सर्वाधिक बाऊंड्रीजच्या (इंग्लंडचे २२ चौकार, २ षटकार, सुपर ओव्हरमध्ये २ चौकार – एकूण २६ बाऊंड्रीज) (न्यूझीलंडचे १४ चौकार, २ षटकार, सुपर ओव्हरमध्ये १ षटकार -एकूण १७ बाऊंड्रीज) निकशावर. आयसीसीच्या या निर्णयावर उलट-सुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. वर्ल्डकपसारख्या महत्वाच्या स्पर्धेत सर्वाधिक बाऊंड्रीजचा निकश आयसीसी कसा काय लावू शकते असा प्रश्न सोशल मिडीयावर उपस्थित केला जात आहे. वर्ल्डकप स्पर्धेत फलंदाजीला झुकते माप देण्यात आल्याचे स्पष्ट होते अशीही चर्चा सुरु आहे.

इंग्लंडच्या विजयात मोठा वाटा उचलणारा बेन स्टोक्स हा मूळचा न्यूझीलंडचा. बेनचे वडील न्यूझीलंडचे नामवंत रग्बीपटू. तो १० वर्षांचा असताना त्यांनी इंग्लंडमध्ये स्थलांतर केले. न्यूझीलंडमध्ये जन्मलेल्या बेन स्टोक्सनेच इंग्लंडच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली, तोच ‘सामनावीर’ ठरला. सामन्यातील शेवटच्या चेेंडूवर मार्टिन गप्टिलला यष्टीरक्षक बटलरकरवी धावचीत करणारा थ्रो होता जेसन रॉयचा. जेसनचा जन्म दक्षिण आफ्रिकेतला. इंग्लंडला जेतेपद मिळवून देण्यात ‘परदेशी’ खेळाडूंनी प्रमुख भूमिका बजावली असे म्हटल्यास वावगे ठरु नये.

- Advertisement -

४० वर्षांपूर्वी लॉर्ड्सवर माईक ब्रिअर्लीच्या इंग्लंडला हरवून लॉईडच्या विंडीजने वर्ल्डकप स्पर्धेत दुसर्‍यांदा जेतेपदाचा मान संपादला होता. ईडन गार्डन्सवर १९८७ मध्ये बॉर्डरच्या ऑस्ट्रेलियाने माईक गॅटिंगच्या इंग्लंडला हरवून वर्ल्डकप पटकावला, तर १९९२ मध्ये इम्रान खानच्या पाकिस्तानने ग्रॅहम गूचच्या इंग्लंडला हरवून वर्ल्डकप पटकावला होता. यंदा मात्र आयरिश कर्णधार इयॉन मॉर्गनच्या नेतृत्त्वाखाली खेळणार्‍या इंग्लंडने वर्ल्डकप पटकावण्याची किमया केली. वर्ल्डकप स्पर्धेतील इंग्लंडचे हे पहिलेवहिले जेतेपद. दोन वर्षांपूर्वी इंग्लंडच्या महिला संघाने भारताचा पराभव करुन वर्ल्डकप पटकावला होता. महिलांपाठोपाठ इंग्लंडच्या पुरुष संघानेही उशिरा का होईना वर्ल्डकपवर आपले नाव कोरले. १९६६ मध्ये यजमान इंग्लंडने बॉबी मूरच्या नेतृत्त्वाखाली खेळताना वर्ल्डकप फुटबॉल स्पर्धेत जेतेपद पटकावले होते. त्या आठवणींनाही लॉर्ड्सवरील विजयामुळे उजाळा मिळाला.

बाराव्या वर्ल्डकप स्पर्धेच्या साखळी लढतीत त्रिशतकी मजल मारणे कठीण नव्हते. परंतु बाद फेरीत २५० धावांचा टप्पाही ओलांडणे अवघड झाले. लॉर्डसवरील अंतिम फेरीत न्यूझीलंडने सावध खेळ करत ८ बाद २४१ ची मजल मारली. सलामीवीर निकोल्सने ५५, तर लॅथमने ४७ धावा केल्या. वोक्स, आर्चर, वूड, आदिल रशीद यांनी धावा रोखल्या आणि डावाच्या मध्यावर (११ ते ४० षटके) लियम प्लंकेटने अचूक मारा करत निकोल्स, विल्यमसन, निशम यांच्या विकेट्स काढल्या. २४२ धावांचा पाठलाग करणे इंग्लंडलाही सोपे नव्हते. जेसन रॉय, जो रुट, कर्णधार मॉर्गन यांना झटपट माघारी पाठविण्यात किवीजना यश आले. बेन स्टोक्स, जोस बटलर या पाचव्या जोडीने ११० धावांची भागीदारी केली.

- Advertisement -

मॅट हेन्री, कॉलिन डी ग्रँडहोम, निशम, फर्ग्युसन यांनी अचूक मारा करत इंग्लंडच्या फलंदाजांना रोखले. इंग्लंड तसेच स्टोक्सच्या सुदैवाने गप्टिलचा थ्रो स्टोक्सच्या बॅटला लागून त्याला अतिरिक्त ४ धावा मिळाल्या. या सहा धावांमुळे इंग्लंडला फायदा झाला. डावतील अखेरच्या षटकात दुसरी धाव घेण्याच्या नादात रशीद तसेच वूड धावचीत झाले. समसमान धावसंख्येमुळे (२४१) सुपर ओव्हरचा अवलंब करावा लागला. त्यातही १५ धावा निघाल्या. आर्चरने पहिला चेंडू वाईड टाकला. पुढच्या चेंडूवर निशमने षटकार खेचला, पण अखेरीस जेसन रॉयच्या फेकीवर (थ्रो) यष्टीरक्षक बटलरने गप्टिलला धावचीत केल्यामुळे सामना टाय (बरोबरीत) झाला. परंतु रॉय, स्टोक्स, बटलर, बेअरस्टो यांनी मारलेल्या चौकार, षटकारांमुळे इंग्लंडने बाजी मारली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -