घरक्रीडाबेरस्टोवच्या शतकामुळे इंग्लंडचा विजय; इमामच्या १५१ धावा वाया

बेरस्टोवच्या शतकामुळे इंग्लंडचा विजय; इमामच्या १५१ धावा वाया

Subscribe

सलामीवीर जॉनी बेरस्टोवच्या ताबडतोड शतकाच्या जोरावर इंग्लंडने तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचा ६ विकेट राखून पराभव केला. या विजयामुळे इंग्लंडने ५ सामन्यांच्या या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे, तर या मालिकेचा पहिला पावसामुळे अनिर्णित राहिला होता. या सामन्यात पाकिस्तानने दिलेले ३५९ धावांचे लक्ष्य इंग्लंडने ५ षटके शिल्लक असतानाच गाठले. इंग्लंडने या वर्षात दुसर्‍यांदा ३५० हून अधिक लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करण्याचा पराक्रम केला आहे.
या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज क्रिस वोक्सने मागील सामन्यातील शतकवीर फखर झमान (२) आणि बाबर आझम (१५) यांना झटपट माघारी पाठवले. त्यामुळे पाकिस्तानची २ बाद २७ अशी अवस्था झाली होती. मात्र, यानंतर इमाम-उल-हक आणि हॅरिस सोहेल यांनी तिसर्‍या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी केली.

आक्रमक फलंदाजी करणारा सोहेल ४१ धावांवर धावचीत झाला. यानंतर कर्णधार सर्फराज अहमदने काही काळ चांगली फलंदाजी केल्यावर त्याला २७ धावांवर लियम प्लंकेटने माघारी पाठवले. दरम्यान, इमामने दुसर्‍या बाजूने संयमाने फलंदाजी करत ५५ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याला असिफ अलीने चांगली साथ दिली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी १५ षटकांत १२५ धावांची भागीदारी केली. इमामने या डावाच्या ३५ व्या षटकात आपले शतक पूर्ण केले. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील सहावे शतक होते. असिफ मात्र ५२ धावांवर बाद झाला. यानंतर इमाम आणि तळाच्या इतर फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी केल्यामुळे पाकिस्तानने ५० षटकांत ९ विकेट गमावत ३५८ धावांचा डोंगर उभारला. इमामने १३१ चेंडूत १६ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने १५१ धावांची खेळी केली. इंग्लंडकडून वोक्सने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या.

- Advertisement -

३५९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला चांगल्या सुरुवातीची गरज होती. ती त्यांना सलामीवीर जॉनी बेरस्टोव आणि जेसन रॉय यांनी मिळवून दिली. या दोघांनी आक्रमक फलंदाजी करत पहिल्या विकेटसाठी १७.३ षटकांतच १५९ धावांची सलामी दिली. रॉयने अवघ्या ४० चेंडूत तर बेरस्टोवने अवघ्या ३६ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. रॉयला ७६ धावांवर फहीम अश्रफने बाद करत ही जोडी फोडली. मात्र, बेरस्टोवने अप्रतिम फलंदाजी सुरू ठेवत ७४ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. यानंतर त्याने अधिकच फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. १२८ धावांवर असताना जुनेद खानच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात तो बाद झाला. त्याने या १२८ धावा ९३ चेंडूत १५ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने केल्या. यानंतर जो रूट (३६ चेंडूत ४३), बेन स्टोक्स (३८ चेंडूत ३७) आणि मोईन अली (३६ चेंडूत नाबाद ४६) यांनी चांगली फलंदाजी करत इंग्लंडला विजय मिळवून दिला.

संक्षिप्त धावफलक –
पाकिस्तान : ५० षटकांत ९ बाद ३५८ (इमाम-उल-हक १५१, आसिफ अली ५२; क्रिस वोक्स ४/६७, टॉम करन २/७४) पराभूत वि. इंग्लंड : ४४.५ षटकांत ४ बाद ३५९ (जॉनी बेरस्टोव १२८, जेसन रॉय ७६, मोईन अली नाबाद ४६; जुनेद खान १/५७).

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -