घरक्रीडाइंग्लिश प्रीमियर लीग : आर्सनलला पराभवाचा धक्का

इंग्लिश प्रीमियर लीग : आर्सनलला पराभवाचा धक्का

Subscribe

निल मॉपेने उत्तरार्धात केलेल्या गोलच्या जोरावर ब्रायटन संघाने इंग्लिश प्रीमियर लीगच्या सामन्यात आर्सनलला २-१ असा पराभवाचा धक्का दिला.आर्सनलने नुकतेच आपल्या प्रशिक्षकांची हकालपट्टी केली होती. मात्र, त्यानंतरही संघाच्या खेळात फारशी सुधारणा झालेली नाही. त्यांना मागील नऊ सामन्यांपैकी एकही सामना जिंकता आलेला नाही. तसेच यंदाच्या प्रीमियर लीग मोसमातील आर्सनलचा हा चौथा पराभव होता. त्यामुळे १५ सामन्यांनंतर त्यांच्या खात्यात केवळ १९ गुण असून ते गुणतक्त्यात दहाव्या स्थानी आहेत.

या सामन्याच्या पूर्वार्धात आर्सनलला चांगला खेळ करता आला नाही. याची कबुली सामन्यानंतर त्यांचे प्रशिक्षक फ्रेडी लुंगबर्ग यांनीही दिली. ब्रायटनला मात्र पहिल्या ४५ मिनिटांत गोल करण्याच्या काही चांगल्या संधी मिळाल्या. त्यांच्या अ‍ॅरॉन कॉनोलीला गोल करता आला नाही, तर मॉपे आणि डेव्ही प्रॉपरने मारलेले फटके ब्रायटनचा गोलरक्षक लेनोने अडवले. अखेर सामन्याच्या ३६ व्या मिनिटाला अ‍ॅडम वेब्स्टरने गोल करत ब्रायटनला १-० अशी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी त्यांना मध्यंतरापर्यंत राखण्यात यश आले.

- Advertisement -

मध्यंतरानंतर आर्सनलने खेळात सुधारणा केली. याचा फायदा त्यांना ५० व्या मिनिटाला मिळाला. मेसूट ओझीलच्या पासवर स्ट्रायकर अ‍ॅलेक्सांडर लॅकाझेटने केलेल्या गोलमुळे आर्सनलने सामन्यात १-१ अशी बरोबरी केली. ६५ व्या मिनिटाला डेविड लुईझने आर्सनलचा दुसरा गोल केला, पण त्याआधी तो ऑफसाईड असल्याचे व्हीएआरमध्ये दिसल्याने हा गोल रद्द करण्यात आला. आर्सनलची बचावफळी ही त्यांची कमकुवत बाजू मानली जाते आणि हे पुन्हा एकदा दिसून आले. सामन्याच्या ८० व्या मिनिटाला अ‍ॅरॉन मॉयच्या पासवर निल मॉपेने गोल करत ब्रायटनला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी त्यांनी शेवटपर्यंत राखत हा सामना जिंकला.

न्यूकॅसलची शेफील्डवर मात

- Advertisement -

अ‍ॅलन सेंट-मॅक्सीमिन आणि जॉन्जो शेल्व्हीने केलेल्या गोलमुळे न्यूकॅसलने इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये शेफील्ड युनायटेडवर २-० अशी मात केली. या सामन्याच्या १५ व्या मिनिटाला सेंट-मॅक्सीमिनने हेडर मारत गोल केला आणि न्यूकॅसलला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर ७० व्या मिनिटाला शेल्व्हीने न्यूकॅसलचा दुसरा गोल केला. न्यूकॅसलचा संघ या विजयामुळे १९ गुणांसह गुणतक्त्यात अकराव्या स्थानावर पोहोचला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -