लिव्हरपूलची मँचेस्टर सिटीवर मात

इंग्लिश प्रीमियर लीग

Mumbai

बलाढ्य संघ लिव्हरपूलने अप्रतिम आक्रमक खेळ करत इंग्लिश प्रीमियर लीगच्या सामन्यात गतविजेत्या मँचेस्टर सिटीवर ३-१ अशी मात केली. त्यांच्याकडून या सामन्यात फॅबिनिओ, मोहम्मद सलाह आणि साडियो माने यांनी गोल केले. हा लिव्हरपूलचा १२ सामन्यांतील अकरावा विजय होता. त्यामुळे ३४ गुणांसह ते अव्वल स्थानी कायम आहेत. यंदा तीन सामने गमावणारा मँचेस्टर सिटीचा संघ २५ गुणांसह चौथ्या स्थानी घसरला आहे.

या सामन्याची लिव्हरपूलने आक्रमक सुरुवात केली. त्यामुळे पहिल्या १३ मिनिटांत त्यांनी २-० अशी आघाडी मिळवली. सहाव्या मिनिटाला फॅबिनिओने लिव्हरपूलचा पहिला गोल केला. त्याआधी लिव्हरपूलच्या पेनल्टी बॉक्समध्ये त्यांचा खेळाडू ट्रेंट अलेक्झांडर-अर्नोल्डच्या हाताला चेंडू लागला, पण सिटीला पेनल्टी मिळाली नाही. त्यामुळे सिटीने नाराजी व्यक्त केली. १३ व्या मिनिटाला आंद्रे रॉबर्टसनच्या पासवर सलाहने हेडर मारत लिव्हरपूलची आघाडी दुप्पट केली.

सिटीलाही गोल करण्याच्या संधी मिळाल्या, पण त्यांच्या आघाडीच्या फळीला या संधींचा फायदा घेता आला नाही. त्यामुळे लिव्हरपूलने मध्यंतराला आपली आघाडी कायम राखली. मध्यंतरानंतर सहा मिनिटांनी साडियो मानेने लिव्हरपूलचा तिसरा गोल केला. पुढे सिटीने सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. ७८ व्या मिनिटाला बर्नार्डो सिल्वाने सिटीचे गोलचे खाते उघडले. मात्र, यानंतर त्यांना गोल करता आला नाही आणि लिव्हरपूलने हा सामना ३-१ असा जिंकला.