घरक्रीडाकर्णधार पोलार्ड, ब्रावोचा भेदक मारा

कर्णधार पोलार्ड, ब्रावोचा भेदक मारा

Subscribe

विंडीज-आयर्लंड मालिका बरोबरीत

कर्णधार किरॉन पोलार्ड आणि अनुभवी ड्वेन ब्रावो यांच्या भेदक मार्‍यामुळे वेस्ट इंडिजने तिसर्‍या टी-२० सामन्यात आयर्लंडचा ९ विकेट राखून पराभव केला. या विजयासह विंडीजने तीन सामन्यांची ही मालिका १-१ अशी बरोबरीत संपवली. या मालिकेतील पहिला सामना आयर्लंडने जिंकला होता, तर दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला होता.

तिसर्‍या सामन्यात विंडीजचा कर्णधार पोलार्डने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. पॉल स्टर्लिंग आणि केविन ओब्रायन या सलामीवीरांनी आयर्लंडच्या डावाची आक्रमक सुरुवात केली. त्यामुळे चौथ्याच षटकात आयर्लंडच्या ५० धावा फलकावर लागल्या. मात्र, पोलार्डने ओब्रायनला (३६), तर ब्रावोने स्टर्लिंगला (११) सलग दोन षटकांत बाद केले. यानंतर कर्णधार अँडी बालबर्नी (२८) आणि बॅरी मकार्थी (१८) या दोघांनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली. त्यामुळे आयर्लंडचा डाव १९.१ षटकांत अवघ्या १३८ धावांत आटोपला. विंडीजकडून पोलार्ड आणि ब्रावो यांनी ३-३ गडी बाद केले.

- Advertisement -

१३९ धावांचा पाठलाग करताना विंडीजचे सलामीवीर लेंडल सिमन्स आणि एविन लुईस यांनी सुरुवातीपासूनच आयर्लंडच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. त्यामुळे विंडीजच्या ५० धावा पाचव्या, तर १०० धावा नवव्या षटकात पूर्ण झाल्या. अखेर लुईसला ४६ धावांवर सिमी सिंगने बाद करत ही जोडी फोडली. लुईस आणि सिमन्सने १३३ धावांची सलामी दिली. सिमन्सने मात्र चांगला खेळ सुरु ठेवत विंडीजचा विजय मिळवून दिला. सिमन्सने ४० चेंडूत ५ चौकार आणि १० षटकारांच्या मदतीने नाबाद ९१ धावांची खेळी केली.

संक्षिप्त धावफलक – आयर्लंड : १९.१ षटकांत सर्वबाद १३८ (ओब्रायन ३६, बालबर्नी २८; पोलार्ड ३/१७, ब्रावो ३/१९) पराभूत वि. वेस्ट इंडिज : ११ षटकांत १ बाद १४० (सिमन्स नाबाद ९१, लुईस ४६; सिमी सिंग १/४१).

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -