सलामीवीर वर्करच्या शतकामुळे न्यूझीलंड “अ” ची मालिकेत बरोबरी

दुसर्‍या सामन्यात भारत अ वर २९ धावांनी मात

Mumbai
वर्कर

सलामीवीर जॉर्ज वर्करच्या शतकामुळे न्यूझीलंड अ संघाने दुसर्‍या अनौपचारिक एकदिवसीय सामन्यात भारत अ संघाला २९ धावांनी पराभूत केले. या विजयामुळे न्यूझीलंड ’अ’ संघाने तीन सामन्यांच्या या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे. वर्करने या सामन्यात १४४ चेंडूत १२ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने १३५ धावांची खेळी केली.

या सामन्यात भारत अ संघाचा कर्णधार मयांक अगरवालने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंड अ संघाच्या डावाची अडखळती सुरुवात झाली. त्यांची ५ बाद १०९ अशी अवस्था झाली होती. मात्र, सलामीवीर वर्करने एक बाजू लावून धरत १२८ चेंडूत आपले स्थानिक एकदिवसीय क्रिकेटमधील १३ वे शतक पूर्ण केले. त्याला जिमी निशम (नाबाद ३३) आणि कोल मॅकोंची (५६) यांनी चांगली साथ दिली. त्यामुळे न्यूझीलंड अ संघाने ५० षटकांत ७ बाद २९५ अशी धावसंख्या उभारली.

याचा पाठलाग करताना भारत अचा सलामीवीर पृथ्वी शॉ पहिल्याच षटकात माघारी परतला. मयांक अगरवाल (३७) आणि ऋतुराज गायकवाड (१७) यांनी दुसर्‍या विकेटसाठी ४७ धावांची भागीदारी करत भारत अचा डाव सावरला. हे दोघे बाद झाल्यावर ईशान किशन (४४), विजय शंकर (४१) आणि कृणाल पांड्या (५१) या मधल्या फळीतील फलंदाजांनी भारत अ संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केले. परंतु, त्यांना इतरांची साथ न लाभल्याने भारत ’अ’ संघाला ५० षटकांत ९ बाद २६६ धावाच करता आल्या आणि त्यांनी हा सामना २९ धावांनी गमावला.

संक्षिप्त धावफलक – न्यूझीलंड अ : ५० षटकांत ७ बाद २९५ (वर्कर १३५, मॅकोंची ५६; पोरेल ३/५०) विजयी वि. भारत अ : ५० षटकांत ९ बाद २६६ (कृणाल ५१, किशन ४४; निशम २/२४).