IPL : मुंबई इंडियन्सकडून खेळण्यास खूप उत्सुक – ट्रेंट बोल्ट

बोल्ट यंदा पहिल्यांदाच मुंबईकडून खेळणार आहे.

Trent Boult
ट्रेंट बोल्ट

गतविजेत्या आणि विक्रमी चार वेळा आयपीएल जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सला यंदाही ही स्पर्धा जिंकण्यासाठी प्रमुख दावेदार मानले जात आहे. मुंबईकडे उत्कृष्ट फलंदाज असून या संघांची गोलंदाजांची फळीही अप्रतिम आहे. मात्र, स्पर्धा सुरु होण्याआधीच मुंबईला मोठा धक्का बसला आहे. मुंबईचा अनुभवी आणि सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा वैयक्तिक कारणांमुळे यंदाच्या मोसमात खेळणार नाही. त्याच्या अनुपस्थितीत प्रामुख्याने जसप्रीत बुमराहवरील जबाबदारी वाढणार आहे. त्याला न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टची साथ लाभेल. बोल्ट यंदा पहिल्यांदाच मुंबईकडून खेळणार असून तो या संघाचे प्रतिनिधित्व करण्यास खूप उत्सुक आहे.

मुंबईविरुद्ध काही सामने खेळलो होतो

यंदा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळण्यास मी खूप उत्सुक आहे. या आधीच्या मोसमांत मी मुंबईविरुद्ध काही सामने खेळलो होतो. हा अनुभव फारसा चांगला नव्हता. मुंबईविरुद्ध खेळणे हे कोणत्याही संघासाठी मोठे आव्हान असते. प्रतिस्पर्धी संघावर नेहमीच खूप दबाव असतो. त्यामुळे यंदा मला मुंबईविरुद्ध न खेळता, मुंबईकडून खेळण्याची संधी मिळणार असल्याचा आनंद आहे. या संघातील खेळाडूंशी जुळवून घेणे अजिबातच अवघड नसल्याचे बोल्ट म्हणाला.

गोलंदाज यशात महत्त्वाचे योगदान देतील

मुंबईच्या संघात बुमराह आणि बोल्ट यांच्यासोबतच नेथन कुल्टर-नाईल, मिचेल मॅक्लेनघन, जेम्स पॅटिन्सन यांसारख्या वेगवान गोलंदाजांचा समावेश आहे. हे सगळे गोलंदाज मिळून मुंबईच्या यशात महत्त्वाचे योगदान देतील असे बोल्टला वाटते. आमची गोलंदाजांची फळी फारच उत्कृष्ट असून याचा भाग असल्याचा मला आनंद आहे. आमच्या गोलंदाजांच्या गाठीशी बराच अनुभव आहे. तसेच आमच्या गोलंदाजीत बरीच विविधता असून या गोलंदाजांनी जगभरात चांगली कामगिरी केली आहे. आम्ही सगळे मिळून यंदाच्या आयपीएल स्पर्धेत दमदार कामगिरी करू आणि मुंबईला यश मिळवून देऊ याची मला खात्री आहे, असेही बोल्टने सांगितले.