घरक्रीडाअखेर संधी मिळालीच!

अखेर संधी मिळालीच!

Subscribe

भारताचा सलामीवीर शिखर धवनला डाव्या अंगठ्याच्या दुखापतीमुळे उर्वरित विश्वचषकाला मुकावे लागणार आहे. त्याच्या अंगठ्याला फ्रॅक्चर असून, त्याची दुखापत पूर्णपणे बरी होण्यासाठी जुलैच्या मध्यापर्यंतचा वेळ लागणार आहे. त्यामुळे त्याच्या जागी अवघ्या ५ एकदिवसीय सामन्यांचा अनुभव असणार्‍या युवा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतला भारतीय संघात स्थान मिळाले आहे. कसोटी क्रिकेट आणि आयपीएलमधील दमदार कामगिरीमुळे पंतची या संघात निवड होईल अशी अपेक्षा होती.

मात्र, विश्वचषकाचा संघ निवडताना निवड समितीने त्याच्याऐवजी अनुभवी दिनेश कार्तिकला दुसरा यष्टीरक्षक म्हणून संधी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, निवड समितीच्या या निर्णयावर अनेकांनी टीका केली होती, ज्यात काही माजी क्रिकेटपटूंचाही समावेश होता, पण संघातील एखादा फलंदाज दुखापतग्रस्त झाला, तर त्याच्या जागी पंतची निवड होईल असे निवड समितीने स्पष्ट केले होते. त्यामुळे धवनला दुखापत झाल्यानंतर पंत मागील आठवड्यातच इंग्लंडसाठी रवाना झाला.

- Advertisement -

पंतला एकदिवसीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगले प्रदर्शन करण्यात अपयश आले आहे. मात्र, कसोटी क्रिकेटमधील त्याचे प्रदर्शन वाखाणण्याजोगे आहे. त्याने ९ सामन्यांत ६९६ धावा केल्या असून, यात दोन शतकांचा समावेश आहे. यापैकी एक शतक त्याने इंग्लंडमध्ये, तर दुसरे शतक ऑस्ट्रेलियामध्ये केले आहे. त्यातच विश्वचषकाआधी झालेल्या आयपीएलमध्ये त्याने दिल्ली कॅपिटल्स संघासाठी फिनिशरची भूमिका अगदी चोख पार पाडली.

त्याने या स्पर्धेच्या १६ सामन्यांत १६३ च्या स्ट्राईक रेटने ४८८ धावा करत दिल्लीला तब्बल ७ वर्षांनी प्ले-ऑफमध्ये पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे दिल्ली संघाचा प्रशिक्षक आणि ऑस्ट्रेलियाचा महान खेळाडू रिकी पॉन्टिंग, दिल्ली संघाचा सल्लागार आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी पंतला विश्वचषकाच्या संघात न निवडून भारताने चूक केली आहे, असे म्हटले होते. मात्र, धवनला फिट होण्यासाठी अजून काही कालावधी लागणार असल्याने निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाने पंतचा विश्वचषकाच्या संघात समावेश केला आहे.

- Advertisement -

धवनला दुखापत झाली कशी?

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या साखळी सामन्यात वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सचा चेंडू धवनच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला लागला होता. सामन्यानंतर झालेल्या वैद्यकीय तपासणीत त्याच्या अंगठ्याला फ्रॅक्चर असल्याचे समोर आले. त्यामुळे तेव्हाच तो या विश्वचषकातून बाहेर जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, तो २-३ सामन्यांनंतर फिट होऊन या आशेने संघ व्यवस्थापनाने त्याला इंग्लंडमध्येच डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्याचा निर्णय घेतला होता. ‘शिखरबाबतचा अंतिम निर्णय आम्ही १०-१२ दिवसांनंतरच घेऊ शकतो. दुखापत झाली म्हणून त्याच्यासारख्या महत्त्वाच्या खेळाडूला घाई करून आम्ही संघातून बाहेर काढू शकत नाही’, असे भारताचे सहाय्यक प्रशिक्षक संजय बांगर मागील बुधवारी म्हणाले होते. मात्र, तो फिट होण्यासाठी अपेक्षा होती, त्यापेक्षा जास्त कालावधी लागणार असल्याने तो यापुढे विश्वचषकात खेळू शकणार नाही.

धवनच्या दुखापतीला आयपीएल जबाबदार?

शिखर धवन आणि भुवनेश्वर कुमार यांच्या दुखापतींना आयपीएलही जबाबदार आहे, असे भारतीय संघाचे ट्रेनर शंकर बासू यांना वाटते. ते याबाबत म्हणाले, आयपीएलदरम्यान खेळाडू रात्री २-३ वाजेपर्यंत झोपत नाहीत. त्यामुळे योग्य तो आणि नियमित सराव करणे त्यांच्यासाठी आव्हान असते. या खेळाडूंना झोपेच्या वेळा, सकस आहार आणि फिटनेस याची जाणीव आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -