IPL 2020 : ‘पहिली आणि अखेरची वॉर्निंग’; मंकडींगबाबत अश्विनचे ट्विट 

अश्विन प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगने दिलेल्या सूचना ऐकताना दिसत आहे.   

रविचंद्रन अश्विन

अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने मागील आयपीएल मोसमात जॉस बटलरला मंकडींग पद्धतीने बाद केले होते. त्यामुळे त्याच्यावर बरीच टीका झाली होती. त्याचे हे कृत्य खेळाडूवृत्तीच्या विरोधात असल्याचे मतही अनेकांनी व्यक्त केले होते. मागील मोसमात किंग्स इलेव्हन पंजाबचे नेतृत्व करणारा अश्विन यंदा दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळत आहे. यंदाच्या मोसमात आम्ही अश्विनला मंकडींग पद्धतीने कोणत्याही फलंदाजाला बाद करू देणार नाही, असे स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी दिल्लीचा प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग म्हणाला होता. अश्विन आता आपल्या प्रशिक्षकाने दिलेल्या सूचना ऐकताना दिसत आहे.

अश्विनने बाद केले नाही

सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांमध्ये सामना झाला. या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १९६ अशी धावसंख्या उभारली. याचा पाठलाग करताना बंगळुरूने चांगली सुरुवात केली होती. त्यामुळे दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने तिसऱ्या षटकात अश्विनला गोलंदाजीला बोलावले. या षटकात बंगळुरूचा सलामीवीर फिंच नॉन-स्ट्राईकवर होता आणि अश्विनने चेंडू टाकण्याआधीच तो क्रिजच्या बाहेर पडला. मात्र, अश्विनने त्याला बाद केले नाही, तर केवळ ताकीद दिली. मात्र, ही ‘२०२० मधील पहिली आणि अखेरची ताकीद होती,’ असे गमतीशीर ट्विट अश्विनने सामन्यानंतर केले.

मी जे केले, ते योग्यच

मागील वर्षी अश्विनने राजस्थान रॉयल्सचा फलंदाज जॉस बटलरला मंकडींग पद्धतीने बाद केले होते. त्यावेळी त्याने ताकीद दिली नव्हती. अश्विन चेंडू टाकण्याआधी थांबला आणि नॉन-स्ट्रायकर बटलरने क्रिज सोडल्यावर अश्विनने त्याला चेंडू न टाकता धावचीत केले. या प्रकारानंतर अश्विनवर जोरदार टीका झाली होती. मात्र, मी जे केले, ते योग्यच होते, असे त्यावेळी अश्विन म्हणाला होता.