घरक्रीडापहिली मल्लखांब विश्व अजिंक्यपद स्पर्धा

पहिली मल्लखांब विश्व अजिंक्यपद स्पर्धा

Subscribe

विश्व मल्लखांब फेडरेशन आणि समर्थ व्यायाम मंदिर यांच्यावतीने दादरच्या शिवाजी पार्क येथे झालेल्या पहिल्या विश्व मल्लखांब अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या महिला संघाने सांघिक जेतेपद पटकावले. भारताच्या महिला संघाने २४४.७३ गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला, तर सिंगापूर आणि मलेशिया यांनी अनुक्रमे ४४.४५ गुणांसह दुसरा आणि ३०.२२ गुणांसह तिसरा क्रमांक मिळवला.

या स्पर्धेमध्ये भारतासह इराण, मलेशिया, सिंगापूर, व्हिएतनाम, जपान, इंग्लंड, नॉर्वे, बहारीन, फ्रान्स, इटली, स्पेन, चेक रिपब्लिक, अमेरिका आणि जर्मनी अशा १५ देशांच्या १५० हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. विविध देशातून आलेल्या या स्पर्धकांचे दोरी आणि पुरलेल्या मल्लखांबावरचे सादरीकरण बघण्यासाठी साधारण तीन-चार हजार प्रेक्षक उपस्थित होते. सांघिक विजेतेपदाच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रत्येक संघामध्ये सहा खेळाडू असणे आवश्यक होते. या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत प्रत्येक खेळाडूने दोरी आणि पुरलेला मल्लखांब अशा दोन साधनांवर दोन लहान व दोन मोठे असे चार संच सादर केले, तसेच महिला आणि पुरुष वयोगटातून निवडल्या गेलेल्या सर्वोत्तम दहा खेळाडूंमध्ये वैयक्तिक अजिंक्यपदासाठी स्पर्धा रंगली. स्पर्धा क्रमांक तीनचे विजेतेपद साधनांवर केल्या जाणार्‍या लहान आणि मोठ्या संचांमधील सर्वोत्तम कामगिरीसाठी देण्यात आले.

- Advertisement -

स्पर्धेच्या सांगता समारंभाच्या निमित्ताने महिला विभागात दुसर्‍या क्रमांकावर आलेल्या इटलीच्या डेलिया सेरुटीने दोरी मल्लखांबावर तर जपानच्या कोइको टाकेमोटोने पुरलेल्या मल्लखांबावर आपले संच सादर केले. पुरुष विभागातून दीपक शिंदे आणि सागर ओहळकर यांनी दोरी व पुरलेल्या मल्लखांबावर आपले कौशल्य सादर केले.

अंतिम निकाल –

सर्वसाधारण जेतेपद : भारत (२४४.७३ गुण)
मोठा संच (दोरीचा मल्लखांब) (पुरुष) : सागर ओहळकर (२८.८० गुण)
मोठा संच (पुरलेला मल्लखांब) (पुरुष) : सागर ओहळकर (२२.८० गुण)
छोटा संच (दोरीचा मल्लखांब) (पुरुष) : दीपक शिंदे (२६.५५ गुण)
छोटा संच (पुरलेला मल्लखांब) (पुरुष) : सागर ओहळकर (२३.४० गुण)
छोटा संच (दोरीचा मल्लखांब) (महिला) : हिमानी परब (२३.४० गुण)
छोटा संच (पुरलेला मल्लखांब) (महिला) : कोइको टाकेमोटो (१७.१० गुण)
मोठा संच (दोरीचा मल्लखांब) (महिला) : हिमानी परब (३६.०० गुण)
मोठा संच (पुरलेला मल्लखांब) (महिला) : कोइको टाकेमोटो (१६.४३ गुण)
सर्वसाधारण जेतेपद (पुरुष) : दीपक शिंदे (८४.३० गुण)
सर्वसाधारण जेतेपद (महिला) : हिमानी परब (७४.७० गुण)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -