भारतासमोर सलामीचे कोडे!

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना आज

rahul-dhavan

भारत आणि ऑस्ट्रेलिया या जागतिक क्रिकेटमधील दोन बलाढ्य संघातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला मंगळवारपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार असून यजमान भारताला काही कठीण निर्णय घ्यावे लागणार आहेत. भारताकडे रोहित शर्मा, लोकेश राहुल आणि शिखर धवन असे तीन उत्तम सलामीचे पर्याय उपलब्ध आहेत. उपकर्णधार रोहितचे संघातील पक्के असून भारतीय संघ व्यवस्थापन पहिल्या सामन्यात फॉर्मात असलेला राहुल आणि अनुभवी धवनपैकी कोणाला संधी देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

मागील वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकानंतर ऑस्ट्रेलियाचा हा पहिलाच एकदिवसीय सामना असेल. दुसरीकडे भारताने आपल्या मागील एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडिजवर मात केली होती. या मालिकेत डावखुरा सलामीवीर धवन दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. त्याच्या अनुपस्थितीत राहुलला सलामीची संधी मिळाली आणि त्याने या संधीचे सोने करताना ३ सामन्यांत एक शतक आणि एक अर्धशतकासह १८५ धावा चोपून काढल्या. तसेच त्याने आणि रोहितने मिळून तीनपैकी दोन सामन्यांत शतकी सलामी दिली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यालाच सलामी करावी असे मत व्यक्त होत आहे.

मात्र, दुखापतीआधी धवननेही एकदिवसीय क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली होती हे विसरून चालणार नाही. एकदिवसीय क्रिकेटमध्ये धवनने २०१८ साली ४९.८३ च्या सरासरीने ८९७ धावा, तर २०१९ साली ३६.४३ च्या सरासरीने ५८३ धावा केल्या. इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकातही त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावले होते. त्यामुळे धवन आणि राहुलपैकी एकाची निवड करणे भारतीय संघ व्यवस्थापनाला अवघड जाणार आहे.

तसेच केदार जाधवला संघातील स्थान टिकवण्यासाठी आपल्या खेळात सुधारणा करणे गरजेचे आहे. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येणार्‍या केदारला मागील काही सामन्यांत धावांसाठी झुंजावे लागले आहे. तर त्याला गोलंदाजीची फारशी संधी मिळालेली नाही. त्यामुळे सध्या जायबंदी असलेल्या हार्दिक पांड्याचे पुनरागमन झाल्यावर केदारचे संघातील स्थान जाऊ शकेल. गोलंदाजांमध्ये भारत जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि नवदीप सैनी या तेज त्रिकुटासह मैदानात उतरण्याची शक्यता आहे. त्यांना कुलदीप यादव आणि रविंद्र जाडेजा या फिरकीपटूंची साथ लाभेल.

दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीची भिस्त पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि लेगस्पिनर अ‍ॅडम झॅम्पाच्या खांद्यावर असेल. तर स्टिव्ह स्मिथ, डेविड वॉर्नर, कर्णधार अ‍ॅरॉन फिंच आणि फॉर्मात असलेल्या मार्नस लबूशेनला या फलंदाजांना रोखण्याचे भारतीय गोलंदाजांसमोर आव्हान आहे. वानखेडेची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. त्यामुळे ज्या संघाचे गोलंदाज सरस कामगिरी करतील, तो संघ जिंकण्याची जास्त शक्यता आहे.

प्रतिस्पर्धी संघ –

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), मनीष पांडे, शिवम दुबे, केदार जाधव, रविंद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर.

ऑस्ट्रेलिया : अ‍ॅरॉन फिंच (कर्णधार), डार्सी शॉर्ट, अ‍ॅश्टन एगर, अ‍ॅलेक्स कॅरी, पॅट कमिन्स, पीटर हँड्सकोम्ब, जोश हेझलवूड, मार्नस लबसचेंग, केन रिचर्डसन, स्टिव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, अ‍ॅश्टन टर्नर, डेविड वॉर्नर, अ‍ॅडम झॅम्पा.

सामन्याची वेळ : दुपारी १.३० पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क

कोहलीला विक्रमाची संधी!

भारताचा कर्णधार विराट कोहलीला मंगळवारी होणार्‍या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या एका अनोख्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी मिळणार आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये घरच्या मैदानावर सर्वाधिक शतकांचा विक्रम सध्या सचिनच्या नावे आहे. त्याने भारतात खेळताना २० शतके लगावली होती. घरच्या मैदानावर कोहलीने आतापर्यंत १९ शतके केली आहेत. काही दिवसांपूर्वीच झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या तिसर्‍या टी-२० सामन्यात कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वात जलद ११ हजार धावांचा विक्रम आपल्या नावे केला.