वर्चस्व सिद्ध करण्यास टीम इंडिया सज्ज!

न्यूझीलंडविरुद्ध पहिली कसोटी आजपासून

Mumbai

विराट कोहलीचा भारतीय संघ सध्या कसोटीतील सर्वोत्तम संघ म्हणून ओळखला जातो. त्यांनी मागील काही वर्षांत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान आपल्याकडे राखले आहे. तसेच आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारताने आतापर्यंत ७ पैकी ७ सामने जिंकले आहेत. मात्र, आता विजयाची मालिका सुरु ठेवणे भारताला सोपे जाणार नाही. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटीला शुक्रवारपासून सुरुवात होणार असून यात कोहलीच्या संघाचे पारडे जड मानले जात आहे.

न्यूझीलंडला यावर्षीची चांगली सुरुवात करता आली नाही. ऑस्ट्रेलियात झालेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने त्यांना ३-० असा व्हाईटवॉश दिला. घरच्या मैदानावर मात्र न्यूझीलंडने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्यांनी मागील १० पैकी ५ सामने जिंकले असून एकही सामना गमावलेला नाही. त्यामुळे भारताला दोन सामन्यांची ही मालिका जिंकणे सोपे जाणार नाही.

वेलिंग्टनच्या बेसिन रिझर्व्ह मैदानावरील खेळपट्टीवर बरेच गवत ठेवण्यात आले आहे आणि ही गोष्ट वेगवान गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरेल. त्यामुळे पृथ्वी शॉ आणि मयांक अगरवाल या भारताच्या नव्या सलामीच्या जोडीला सुरुवातीला खेळपट्टीवर टिकणे अवघड जाऊ शकेल. या कसोटीत न्यूझीलंड ट्रेंट बोल्ट, टीम साऊथी आणि कायेल जेमिसन या तेज त्रिकुटासह मैदानात उतरण्याची शक्यता आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज निल वॅग्नर या सामन्यात खेळणार नाही आणि ही गोष्ट भारताच्या पथ्यावर पडू शकेल.

भारतीय संघ सहा फलंदाजांसह मैदानात उतरण्याची शक्यता आहे. हनुमा विहारीने सराव सामन्यात शतक केल्याने पहिल्या कसोटीत त्याला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच अनुभवी वृद्धिमान साहा यष्टिरक्षणाची धुरा सांभाळेल. जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा आणि मोहम्मद शमी वेगवान गोलंदाजांकडून उत्तम कामगिरीची अपेक्षा केली जात आहे. रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जाडेजा या फिरकीपटूंमध्ये कोणाला संधी मिळणार हे मात्र निश्चित नाही.

प्रतिस्पर्धी संघ (अंतिम १२) –

भारत : विराट कोहली (कर्णधार), मयांक अगरवाल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रविंद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा.

न्यूझीलंड : केन विल्यमसन (कर्णधार), टॉम ब्लंडेल, टॉम लेथम, रॉस टेलर, हेन्री निकोल्स, बीजे वॉटलिंग (यष्टीरक्षक), कॉलिन डी ग्रँडहोम, डॅरेल मिचेल, कायेल जेमिसन, ट्रेंट बोल्ट, टीम साऊथी, एजाज पटेल.

सामन्याची वेळी : पहाटे ४ पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क