सचिनच्या वर्ल्डकप संघात पाच भारतीय; धोनी नाही

Mumbai
सचिन,धोनी

न्यूझीलंडविरुद्ध उपांत्य फेरीतील सामन्यात पराभूत झाल्यामुळे भारताचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले. मात्र, त्याआधी साखळी सामन्यांमध्ये भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी केली होती. ९ पैकी ७ साखळी सामने जिंकत त्यांनी गुणतक्त्यात अव्वल स्थान पटकावले. केवळ हा विश्वचषक जिंकणार्‍या इंग्लंडलाच भारताचा पराभव करण्यात यश आले. या सामन्यांमध्ये भारताचा सलामीवीर रोहित शर्माने दमदार प्रदर्शन करत विक्रमी ५ शतके लगावली.

तसेच त्याने ८१ च्या सरासरीने ६४८ धावा काढत सर्वाधिक धावा करणार्‍या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान मिळवले. त्यामुळे त्याची आयसीसीच्या विश्वचषक संघात निवड झाली होती. आयसीसीप्रमाणेच भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनेही विश्वचषकातील सर्वोत्तम कामगिरी करणार्‍या खेळाडूंचा संघ बनवला. त्याच्या संघात पाच भारतीय खेळाडूंना स्थान मिळाले, पण या संघात अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज महेंद्रसिंग धोनीचा समावेश नव्हता.

धोनीवर मागील एक-दोन वर्षांत संथ फलंदाजीमुळे बरीच टीका झाली आहे. या विश्वचषकातही त्याच्या काही संथ खेळींमुळे त्याच्यावर टीका झाली. खासकरून अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात संघ अडचणीत असल्यामुळे त्याने संयमाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याला १-२ धावा काढत धावफलक हलता ठेवण्यातही अपयश आले.

त्याने या सामन्यात ५२ चेंडूत अवघ्या २८ धावा केल्या होत्या. त्याच्या या संथ खेळीमुळे सचिनने धोनीवर टीका केली. मात्र, त्याने या स्पर्धेच्या ९ सामन्यांत ४५.५० च्या सरासरीने २७३ धावा केल्या. त्याने या धावा ८८ च्या स्ट्राईक रेटने केल्या. परंतु त्याच्याऐवजी सचिनने आपल्या संघात इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टोची यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून निवड केली. इंग्लंडचा सलामीवीर बेअरस्टोने या विश्वचषकाच्या ११ सामन्यांत २ शतकांच्या मदतीने ५३२ धावा केल्या.

सचिनच्या संघात धोनी नसला तरी त्याने रोहित, विराट कोहली, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि केवळ २ सामने खेळणारा रविंद्र जाडेजा या पाच भारतीय खेळाडूंना संघात स्थान दिले आहे. मात्र, त्याच्या या संघाचा कर्णधार म्हणून विराट नाही, तर न्यूझीलंडच्या केन विल्यमसनची निवड केली आहे. १० सामन्यांत ५७८ धावा करणार्‍या विल्यमसनला विश्वचषकातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला. विश्वविजेत्या इंग्लंडच्या बेअरस्टो, बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर या तीन खेळाडूंची सचिनने त्याच्या संघात निवड केली. त्याआधी आयसीसीने आपल्या विश्वचषक संघाची घोषणा केली होती, ज्यात रोहित आणि बुमराह या दोनच भारतीयांचा समावेश होता.

सचिनचा विश्वचषक संघ –

रोहित शर्मा, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), केन विल्यमसन (कर्णधार), विराट कोहली, शाकिब अल हसन, बेन स्टोक्स, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, मिचेल स्टार्क, जोफ्रा आर्चर, जसप्रीत बुमराह.