झारखंडाला फॉलोऑन

महाराष्ट्राविरुद्ध पहिला डाव १७० धावांत संपुष्टात

Mumbai

डावखुरा फिरकीपटू सत्यजित बच्छाव आणि वेगवान गोलंदाज मुकेश चौधरीच्या भेदक गोलंदाजीमुळे महाराष्ट्राविरुद्धच्या रणजी सामन्यात झारखंडवर फॉलोऑनची नामुष्की ओढवली. महाराष्ट्राने पहिल्या डावात ४३४ धावा केल्या, ज्याचे उत्तर देताना झारखंडचा डाव १७० धावांतच संपुष्टात आला. महाराष्ट्राच्या बच्छावने ५, तर चौधरीने ३ मोहरे टिपले. तिसर्‍या दिवसाचा खेळ संपला तेव्हा झारखंडची दुसर्‍या डावात १ बाद ४७ अशी धावसंख्या होती. ते अजूनही २१७ धावांनी पिछाडीवर होते.

रिलायन्सच्या मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात तिसर्‍या दिवशी झारखंडने २ बाद २ वरुन पुढे खेळण्यास सुरुवात केली. चौधरीने सलामीवीर १३ धावांवर बाद केले. मात्र, कर्णधार सौरभ तिवारी आणि विराट सिंग या चौथ्या जोडीने झुंज देत ९९ धावांची भागीदारी केली. मात्र, बच्छावने विराट सिंगला ४३ धावांवर माघारी पाठवले. यानंतर सूरज आणि सुमित कुमार हे खातेही न उघडता माघारी परतल्याने झारखंडची ६ बाद १२१ अशी अवस्था झाली.

कर्णधार तिवारीने एकाकी झुंज देत अर्धशतक झळकावले. मात्र, त्याला ६२ धावांवर बच्छावने बाद केले, तेव्हा संघाची धावसंख्या १३३ होती. उर्वरित चार फलंदाजांनी अवघ्या ३७ धावांची भर टाकली. त्यामुळे झारखंडचा पहिला डाव १७० धावांवर आटोपला. महाराष्ट्राच्या बच्छावने ५५ धावांत ५ गडी बाद केले. चौधरीने ३ आणि अझिम काझीने २ बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक – महाराष्ट्र : पहिला डाव ४३४ वि. झारखंड : १७० (सौरभ तिवारी ६२; सत्यजित बच्छाव ५/५५, मुकेश चौधरी ३/२१) आणि १ बाद ४७ (नझिम सिद्दीकी नाबाद २३; सत्यजित बच्छाव १/१८).

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here