घरक्रीडासध्या तरी विचार नाही, पण...

सध्या तरी विचार नाही, पण…

Subscribe

निवृत्तीबाबत कोहलीचे विधान

भारताचा कर्णधार विराट कोहली सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखला जातो. मागील दशकात सर्वाधिक धावा करणार्‍या फलंदाजांमध्ये कोहली अव्वल स्थानावर आहे. कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत 50 हून अधिकच्या सरासरीने धावा करणारा कोहली हा एकमेव फलंदाज आहे. त्यातच त्याने आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे नेतृत्व करताना फलंदाजीत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. इतके क्रिकेट खेळल्याचा त्याच्यावर नक्कीच ताण आहे, पण किमान तीन वर्षे तरी तो क्रिकेटचे तिन्ही प्रकार खेळत राहणार आहे. या तीन वर्षांमध्ये दोन टी-20 आणि एक एकदिवसीय विश्वचषक होणार आहेत.

भारतामध्ये होणार्‍या 2021 टी-20 विश्वचषकानंतर तू क्रिकेटच्या एका प्रकारातून निवृत्त होण्याचा विचार करशील का, असे विचारले असता कोहली म्हणाला, सध्या तरी मी पुढील तीन वर्षांसाठी स्वत:ला तयार करत आहे. तीन वर्षे तरी मी क्रिकेटचे तिन्ही प्रकार खेळत राहणार आहे. त्यानंतर मात्र चित्र बदलू शकेल. जवळपास आठ वर्षे मी वर्षातील 300 दिवस क्रिकेट खेळत आहे, ज्यात प्रवास आणि सराव शिबीरांचाही समावेश असतो. प्रत्येक गोष्टीत मी 100 टक्के देतो. या सगळ्याचा नक्कीच ताण येतो आणि यात लपवण्यासारखे काहीच नाही.

- Advertisement -

शरीरावरील ताण कमी करण्यासाठी अधूनमधून विश्रांती घेणे फायदेशीर ठरते असे कोहलीला वाटते. खेळाडू विश्रांती घेण्याचा विचार करत नाहीत असे नाही. आता खेळाडू, खासकरून जे क्रिकेटचे तिन्ही प्रकार खेळतात ते, व्यग्र वेळापत्रकातूनही विश्रांतीसाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातच मी कर्णधारपदही भूषवत असल्याने सराव सत्रातही मला अधिक मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे ठराविक कालांतराने विश्रांती घेणे माझ्यासाठी फायदेशीर ठरते. मात्र, कदाचित वयाच्या 34-35 व्या वर्षी माझे शरीर इतका ताण सहन करु शकणार नाही. त्यावेळी मी क्रिकेटच्या एका प्रकारातून निवृत्त होण्याचा विचार करु शकतो, असे 31 वर्षीय कोहलीने नमूद केले.

जागतिक कसोटी स्पर्धा सर्वात महत्त्वाची!

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा ही आयसीसीची सर्वात महत्त्वाची स्पर्धा आहे, असे विराट कोहलीने नमूद केले. भारतीय संघ या स्पर्धेच्या गुणतक्त्यात अव्वल स्थानी आहे. माझ्या मते जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा ही आयसीसीची सर्वात महत्त्वाची स्पर्धा आहे. इतर सर्व स्पर्धा त्यानंतर येतात. त्यामुळे 2021 मध्ये लॉर्ड्सला होणार्‍या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळण्याचे प्रत्येक संघाचे लक्ष्य आहे. या सामन्यासाठी लवकरात लवकर पात्र होण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे कोहली म्हणाला.

- Advertisement -

पृथ्वीने आपला नैसर्गिक खेळच करावा!

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. पहिल्या कसोटीत मयांक अगरवालसोबत युवा पृथ्वी शॉ भारताच्या डावाची सुरुवात करणार असल्याचे संकेत कर्णधार कोहलीने दिले. पृथ्वी खूप प्रतिभावान खेळाडू आहे. तो आक्रमक शैलीत फलंदाजी करतो आणि त्याने नैसर्गिक खेळ करत राहणे आवश्यक आहे. आमच्या फलंदाजांवर परदेशात खेळण्याचा दबाव नाही. ऑस्ट्रेलियामध्ये मयांकने ज्याप्रकारे फलंदाजी केली होती, तशीच फलंदाजी आता पृथ्वीने न्यूझीलंडमध्ये केली पाहिजे. ते दोघे निडरपणे खेळले, तर संघातील इतर खेळाडूंचाही आत्मविश्वास वाढेल, असे कोहलीने स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -