घरक्रीडाम्हणून मी निवृत्त झालो - सरदार सिंग

म्हणून मी निवृत्त झालो – सरदार सिंग

Subscribe

एशियाड स्पर्धा सुरू होण्याआधी सरदारने २०२० ऑलिम्पिकपर्यंत खेळत राहणार असल्याचे म्हटले होते.

भारताचा माजी कर्णधार सरदार सिंगने एशियाडनंतर आंतरराष्ट्रीय हॉकीतून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला होता. एशियाड स्पर्धा सुरू होण्याआधी त्याने २०२० ऑलिम्पिकपर्यंत खेळत राहणार असल्याचे म्हटले होते. पण नंतर अचानकच त्याने निवृत्ती घेतल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. पण सरदारने आता आपण निवृत्त का झालो याचा खुलासा केला आहे. त्याने त्याच्या निवृत्तीसाठी ‘हॉकी इंडिया’चे उच्च कामगिरी संचालक डेविड जॉन आणि पूर्व प्रशिक्षक जोर्द मरीन हे जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

मला काहीही पूर्वकल्पना न देता संघातून वगळले

आपल्या निवृत्तीच्या निर्णयाबाबत सरदार म्हणाला, “माझ्या निवृत्तीसाठी बरीच कारणे होती. रोलेन्ट ओल्टमन्स यांना प्रशिक्षकपदावरून काढण्यात आले. त्यांच्याजागी जोर्द मरीन यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली. त्यांना आणि ‘हॉकी इंडिया’चे उच्च कामगिरी संचालक डेविड जॉन यांना संघात नव्या खेळाडूंना संधी द्यायची होती. आम्ही २०१७ चा आशिया चषक जिंकलो. त्यानंतर मला पुढे खेळत राहायचे होते. पण मला काहीही पूर्वकल्पना न देता संघातून वगळण्यात आले. त्यानंतर मला ज्युनियर खेळाडूंसोबत अझलन शहा चषकात (२०१८) खेळण्यासाठी पाठवले. पण या स्पर्धेनंतर पुन्हा मला राष्ट्रकुल स्पर्धेसाठी संघात स्थान मिळाले नाही. त्यामुळे शारीरिकदृष्ट्या फिट असूनही मी माझ्या खेळाबद्दल साशंक झालो.”

जॉनने सरदारला ‘स्लो’ खेळाडू म्हटले

सरदारने यो-यो टेस्टमध्ये २१.४ गुण मिळवूनही डेविड जॉन यांनी त्याला ‘स्लो’ खेळाडू असे संबोधले होते. त्याबद्दल सरदार म्हणाला, “मी कधीच वेगाने धावणारा खेळाडू नव्हतो. माझ्या खेळण्याची ती शैली नव्हती. त्यामुळे मला माहित नाही की जॉन मला ‘स्लो’ खेळाडू का म्हणाले. त्यांनी मला माझ्या खेळातही काही बदल करण्यास सांगितले आणि मी ते करण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतरही मला वारंवार संघातून वगळले गेले. त्यामुळे मी निवृत्त होण्याचा निर्णय घेतला.”
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -