कसोटीत हॅटट्रिक घेणारा श्रीलंकेचा माजी गोलंदाज मॅच फिक्सिंगमध्ये दोषी 

युएईमधील एका स्थानिक टी-२० स्पर्धेत मॅच फिक्सिंग केल्याचा आरोप होता.

chaminda vaas and nuwan zoysa
चामिंडा वास आणि नुवान झोयसा

श्रीलंकेचा माजी डावखुरा गोलंदाज, गोलंदाजी प्रशिक्षक नुवान झोयसा मॅच फिक्सिंगमध्ये दोषी आढळला आहे. झोयसावर याआधीच मॅच फिक्सिंगच्या आरोपांमुळे निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. आता झोयसाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) भ्रष्टाचारविरोधी आचार संहितेतील तीन नियमांचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबतची माहिती क्रिकेटच्या जागतिक समितीने गुरुवारी दिली. तसेच झोयसावरील बंदी कायम राहील आणि पुढील शिक्षा लवकरच सांगण्यात येईल, असेही आयसीसीने त्यांच्या पत्रकात म्हटले.

युएईमधील एका स्थानिक टी-२० स्पर्धेत मॅच फिक्सिंग केल्याच्या आरोपावरून मे २०१९ मध्ये झोयसावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्याने भ्रष्टाचारविरोधी पथकासमोर सुनावणीच्या आपल्या अधिकाराचा वापर केला होता. परंतु, तो आता मॅच फिक्सिंगमध्ये दोषी आढळला आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज झोयसाने ३० कसोटी आणि ९५ एकदिवसीय सामन्यांत श्रीलंकेचे प्रतिनिधित्व करताना अनुक्रमे ६४ आणि १०८ विकेट घेतल्या होत्या. त्याने १९९९-२००० मध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या कसोटी सामन्यात पहिल्याच षटकात हॅटट्रिक घेण्याचा पराक्रम केला होता. त्याने अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना २००७ मध्ये खेळला होता. त्यानंतर सप्टेंबर २०१५ मध्ये त्याची श्रीलंकेचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून निवड झाली होती. तसेच त्याने श्रीलंका क्रिकेटच्या हाय परफॉर्मन्स केंद्रामध्येही काम केले होते.