French Open 2020 : राफेल नदालची उपांत्य फेरीत धडक; सिनेरवर केली मात   

नदालचा उपांत्य फेरीत अर्जेंटिनाच्या दिएगो स्वात्झमनशी सामना होईल.

rafael nadal
राफेल नदाल

‘क्ले कोर्ट’चा बादशाह राफेल नदालने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. फ्रेंच ओपन सर्वाधिक वेळा जिंकण्याचा विक्रम नदालच्या नावे असून त्याने तब्बल १२ वेळा या स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. त्याने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात इटलीच्या यानिक सिनेरवर ७-६, ६-४, ६-१ अशी सरळ सेटमध्ये मात केली. आता नदालचा उपांत्य फेरीत अर्जेंटिनाच्या दिएगो स्वात्झमनशी सामना होईल. स्वात्झमनने मागील महिन्यात झालेल्या इटालियन ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत नदालला पराभवाचा धक्का दिला होता.

सिनेरने चांगली झुंज दिली

फ्रेंच ओपनमध्ये मात्र नदालला पराभूत करणे अजिबातच सोपे नाही आणि यानिक सिनेर या इटलीच्या १९ वर्षीय खेळाडूला उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात हे समजले. नदालने उत्कृष्ट खेळ करत त्याला सरळ सेटमध्ये पराभूत केले. सिनेरची फ्रेंच ओपन स्पर्धेत खेळण्याची ही पहिलीच वेळ होती. पदार्पणातच या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठणारा सिनेर हा नदालनंतर (२००५) पहिलाच खेळाडू ठरला. ‘सिनेर खूपच युवा खेळाडू आहे. मात्र, त्याच्यात खूप ताकद असून तो दमदार फटके मारतो. पहिल्या दोन सेटमध्ये त्याने चांगली झुंज दिली. त्याचे कौतुक झालेच पाहिजे,’ असे सामन्यानंतर नदालने सांगितले.

पेट्रा क्विटोव्हाची आगेकूच

सातव्या सीडेड चेक प्रजासत्ताकच्या पेट्रा क्विटोव्हाला फ्रेंच ओपनची उपांत्य फेरी गाठण्यात यश आले. तिने महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत जर्मनीच्या लॉरा सिगमंडचा ६-३, ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली. फ्रेंच ओपनची उपांत्य फेरी गाठण्याची ही क्विटोव्हाची आठ वर्षांत पहिलीच वेळ होती. क्विटोव्हाने याआधी दोनदा विम्बल्डन स्पर्धा जिंकली आहे, पण तिला फ्रेंच ओपनचे जेतेपद पटकावता आलेले नाही.