घरक्रीडापंतला पूर्ण पाठिंबा!

पंतला पूर्ण पाठिंबा!

Subscribe

कर्णधार कोहलीचे उद्गार

भारताचा कर्णधार विराट कोहलीने धावांसाठी झुंजणार्‍या युवा रिषभ पंतला पाठिंबा दर्शवला आहे. पंतला मागील काही काळात क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे त्याने कसोटी संघातील स्थान गमावले आहे. त्याने यष्टींमागे आणि डीआरएसच्या वापरातही काही चुका केल्या आहेत. आता निवड समितीने टी-२० संघात संजू सॅमसनची राखीव यष्टीरक्षक म्हणून निवड केल्याने पंतवरील दबाव आणखीच वाढला आहे. मात्र, आमचा पंतला पूर्ण पाठिंबा आहे, असे कर्णधार कोहलीने विंडीजविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्याच्या पूर्वसंध्येला स्पष्ट केले.

रिषभ हा खूप प्रतिभावान खेळाडू आहे आणि त्याच्यातील क्षमतेवर आम्हाला विश्वास आहे. चांगली कामगिरी करण्याची खेळाडूवर नक्कीच जबाबदारी असते, पण खेळाडूला पाठिंबा देणे ही संघ व्यवस्थापनाची जबाबदारी असते. आमचा त्याला पूर्ण पाठिंबा आहे आणि आम्ही त्याला वेळही देत आहोत. त्याला पाठिंबा न देणे हे त्याचा अनादर करण्यासारखे आहे. रोहित (शर्मा) काही दिवसांपूर्वी म्हणाला होता की, रिषभबाबतची चर्चा आता थांबवा आणि मी त्याच्याशी सहमत आहे. रिषभ हा मॅचविनर आहे. तो एकदा फॉर्मात आला की, तुम्हाला वेगळा रिषभ पाहायला मिळेल. त्याला आम्ही एकटा टाकू शकत नाही. आमचा त्याला पूर्ण पाठिंबा आहे आणि त्याच्यासाठी काहीही करण्याची आमची तयारी आहे, असे कोहली म्हणाला.

- Advertisement -

केवळ एका वेगवान गोलंदाजाचे स्थान रिक्त!

पुढील वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणार्‍या टी-२० विश्वचषकासाठी जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी यांची भारताच्या संघात निवड होणार हे जवळपास निश्चित आहे, असे संकेत विराट कोहलीने गुरुवारी दिले. आमच्या संघात केवळ एका वेगवान गोलंदाजाचे स्थान रिक्त आहे. तीन जणांचे स्थान जवळपास निश्चित आहे. मात्र, वेगवान गोलंदाजांबाबत आम्हाला चिंता नाही. भूवी आणि बुमराह हे अनुभवी गोलंदाज आहेत आणि दीपक चहरनेही त्याला मिळालेल्या संधीचा उत्तम वापर केला आहे. शमीचे आता पुनरागमन झाले असून तोसुद्धा चांगली गोलंदाजी करत आहे. त्याच्यासारखा गोलंदाज ऑस्ट्रेलियामध्ये यशस्वी होऊ शकेल याची मला खात्री आहे, असे कोहलीने नमूद केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -