Fuzhou China Open : श्रीकांतची विजयी सलामी

भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने चीन ओपन स्पर्धेला विजयी सलामी दिली.

Mumbai
किदाम्बी श्रीकांत (सौ-hindi.firstpost)

भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने चीन ओपन स्पर्धेला विजयी सलामी दिली. त्याने पहिल्या फेरीत फ्रान्सच्या ल्युकास कोर्वीचा पराभव करत स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. तर एचएस प्रणॉयला मात्र पराभवाचा सामना करावा लागला.

दुसऱ्या फेरीत इंडोनेशियाच्या टॉमी सुगीर्टोशी सामना

चीन ओपनच्या पहिल्या फेरीतील सामन्यात किदाम्बी श्रीकांतने ल्युकास कोर्वीचा २१-१२, २१-१६ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. या सामन्याच्या पहिल्या सेटच्या मध्यंतराला श्रीकांतने ११-७ अशी आघाडी मिळवली. पुढेही त्याने आपला चांगला खेळ सुरु ठेवत हा सेट २१-१२ असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये कोर्वीने श्रीकांतला चांगली लढत दिली. या सेटच्या मध्यंतरापर्यंत श्रीकांतकडे ११-९ अशी अवघ्या २ गुणांची आघाडी होती. यानंतर श्रीकांतने आपला खेळ सुधारत हा सेट २१-१६ असा जिंकत हा सामनाही जिंकला. त्याचा दुसऱ्या फेरीत इंडोनेशियाच्या टॉमी सुगीर्टो याच्याशी सामना होईल.

क्रिस्टीकडून प्रणॉय पराभूत

भारताच्याच एचएस प्रणॉयचा मात्र पहिल्याच फेरीत पराभव झाला. त्याचा एशियाडमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या जोनाथन क्रिस्टीने ११-२१, १४-२१ असा पराभव केला. पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रणकिरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीने स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यांनी डेन्मार्कच्या सातव्या सीडेड मॅड्स पिलेर कोल्डिंग आणि मॅट कोनार्ड-पीटर्सन या जोडीचा २३-२१, २४-२२ असा सरळ सेटमध्ये पराभव केला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here