घरक्रीडागिलचे विक्रमी द्विशतक; भारत अला विजयाची संधी

गिलचे विक्रमी द्विशतक; भारत अला विजयाची संधी

Subscribe

युवा फलंदाज शुभमन गिलचे विक्रमी द्विशतक आणि कर्णधार हनुमा विहारीच्या शतकामुळे भारत अ संघाला वेस्ट इंडिज अ संघाविरुद्धचा तिसरा अनधिकृत कसोटी सामना जिंकण्याची संधी निर्माण झाली आहे. गिलने या सामन्याच्या दुसर्‍या डावात नाबाद २०४ धावांची खेळी केली. हे त्याचे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिले द्विशतक होते. या खेळीमुळे १९ वर्षीय गिल प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा भारताचा सर्वात युवा फलंदाज ठरला आहे. याआधी हा विक्रम गौतम गंभीरच्या नावे होते.

भारत अ संघाने पहिल्या डावात केलेल्या २०१ धावांचे उत्तर देताना विंडीज अ संघाला १९४ धावाच करता आल्या. दुसर्‍या डावात भारत अची खराब सुरुवात झाली. त्यांची ४ बाद ५० अशी अवस्था झाली होती. मात्र, यानंतर गिल आणि कर्णधार विहारी यांनी उत्कृष्ट फलंदाजी करत भारत अ संघाच्या डावाला आकार दिला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ३१५ धावांची अभेद्य भागीदारी रचली. गिलने सुरुवातीपासूनच गोलंदाजांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याने अवघ्या ११० चेंडूत आपले शतक पूर्ण केले. यानंतर त्याने संयमाने फलंदाजी केली. पुढील १०० धावा करण्यासाठी त्याला १३६ चेंडू लागले. एकूण त्याने या डावात २४८ चेंडूत १९ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद २०४ धावा केल्या. दुसर्‍या बाजूने विहारीने संयमी खेळ करत २२१ चेंडूत १० चौकार आणि एका षटकारासह नाबाद ११८ धावा केल्या. भारत अ संघाने आपला दुसरा डाव ४ बाद ३६५ धावांवर घोषित केला. त्यामुळे त्यांनी विंडीज ’अ’ संघापुढे हा सामना जिंकण्यासाठी ३७३ धावांचे आव्हान ठेवले.

- Advertisement -

तिसर्‍या दिवसअखेर विंडीज अची दुसर्‍या डावात बिनबाद ३७ अशी धावसंख्या होती. मात्र, विंडीज अच्या फलंदाजांना मागील दोन सामन्यांत चांगली कामगिरी करण्यात अपयश आले आहे. त्यामुळे या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी मिळवलेल्या भारत अ संघाला हा सामना जिंकत विंडीज अला व्हाईटवॉश देण्याची संधी निर्माण झाली आहे.

संक्षिप्त धावफलक –

भारत अ : २०१ आणि ४ बाद ३६५ डाव घोषित (शुभमन गिल नाबाद २०४, हनुमा विहारी नाबाद ११८; चेमार होल्डर २/८८) वि. वेस्ट इंडिज अ : १९४ आणि बिनबाद ३७.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -